पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 स्त्रियांचा प्रश्न थोडक्यात काय आहे? जैविक शास्त्राच्या दृष्टीने किंवा मानसशास्त्राच्या दृष्टीनेही पाहिले तर स्त्री-पुरुषभेद हा अंशात्मक असतो, गुणात्मक नाही. परंतु, समाजातील श्रमविभागणी मात्र हा गुणवत्तेचा भेद असल्याचे धरून केली जाते. त्यामुळे साहजिकच अनेक स्त्रिया त्यांची सार्वत्रिक कर्तबगारी कोंडून ठेवून चूल आणि मूल या चक्रात अडकतात तर ऋजू स्वभावाचे अनेक पुरुष विनाकारणच पुरुषी समजल्या जाणाऱ्या रौद्र कामात जन्मभर अडकून राहतात. अशी विभागणी शरीररचनेच्या आधारेने झाली. पुरुष बाहेरील कामासाठी जास्त सशक्त असल्यामुळे स्त्रियांकडे घरकाम आले अशी उपपत्ती एंगल्स्ने मांडली. आज ही गोष्ट हास्यास्पद वाटत असेल तरी, विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, त्यांनी ठाम सिद्धांत मांडला की, 'समाजवादी व्यवस्थेत सर्व मालत्तेचे राष्ट्रीयीकरण झाले आणि सर्वच पाळणाघरे व सार्वजनिक स्वयंपाकघरे तयार झाली म्हणजेच स्त्रियांची चूलमूल या कैदखान्यातून सुटका होईल.'
 लिंगभेदावर आधारलेल्या श्रमविभागणीची साधीसोपी उपपत्ती सांगता येईल.
 पुरुषांनी हाती तलवार घेतली म्हणून स्त्रियांकडे उरलेले घरकाम आले. पुरुषांनी तलवार घेतली ती त्यांच्या शारीरिक सामर्थ्यामुळे नाही. लुटालुटीच्या एका कालखंडामध्ये लुटारूंच्या झुंडी अन्न, संपत्ती आणि स्त्रिया पळवून नेत; टोळ्यांची लोकसंख्या वाढवण्याच्या कामी स्त्रियांचा उपयोग होई. याउलट, पुरुष पकडून नेण्यात त्यांना काहीच स्वारस्य नसल्यामुळे त्यांची सरसकट कत्तल होत असे. पुरुषांनी तलवार घेतली ती स्वसंरक्षणासाठी. गाईम्हशींच्या गोठ्यात गोऱ्हे आणि रेडे जन्मताच मारले जातात व कालवडी जन्मल्याचा आनंद साजरा होतो त्यातलाच हा प्रकार.

 मग अशी आडमुठी श्रमविभागणी आजपर्यंत चालली कारण सर्वच समाज अशा पुरुषसत्ताक पद्धतीने चालत होता. घरकाम हा निजी मामला होता आणि स्पर्धात्मक बाजारपेठेच्या व्यवस्थेशी गृहकृत्यांचा संबंध येत नव्हता त्यामुळेच ही अशी अजागळ व्यवस्था टिकू शकली. ही व्यवस्था दूर करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही आपापल्याआवडी निवडीनुसार कामाची निवड करू देणे. ज्या स्त्रियांना घराबाहेरील काम करण्यात आनंद वाटत असेल किंवा अशी कामे करण्याची ज्यांची विशेष कुवत किंवा कर्तबगारी असेल त्यांनी अशी कामे करण्यात कोणतीही सामाजिक निबंधांची अडचण येता कामा नये. पुरुषांनाही परंपरेने त्यांच्या समजल्या जाणाऱ्या रौद्र कामापासून दूर व्हायचे असेल तर तशी मुभा असली पाहिजे. लिंगभेदावर आधारलेली

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १२२