पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यापार संघटनेने काम कसे करावे, आरोग्य, शिक्षण, आंतरराष्ट्रीय संघटनांचे कामकाज, कामगारांच्या कामांसंबंधी नियम, धोक्याच्या मादक, स्फोटक, किरणोत्सर्गी वस्तूंची आंतरराष्ट्रीय तस्करी, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा शांततेकरिता उपयोग, बौद्धिक संपदांचा हक्क, राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशेबाची पद्धत, विकासाच्या वेगवेगळ्या औषधोपचार पद्धतींचे गुणावगुण, एड्स रोग, मुलांची शिक्षणपद्धती इत्यादी इत्यादी आणि कितीतरी. या सर्वांवर बोलण्याचा आणि त्याबद्दल शिफारशी करण्याचा आपला अधिकार आहे असा समज त्यांनी करून घेतला. सरकारी प्रतिनिधीही थोडेच कमी पडणार? त्यांनीही आणखी काही विषय पत्रिकेवर वाढवले आणि सहभागी कुटुंब आणि बेजिंगमधील मंजूर कार्यक्रमासाठी आवश्यक ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय साधनसंपत्ती यावरही ठराव केले.
 महिलांचा प्रश्न
 पहिला प्रश्न उभा राहातो तो हा, की स्त्रियांच्या बैठकी, परिषदा, संमेलने जेव्हा जेव्हा होतात तेव्हा त्यांच्या विषयपत्रिकेवरील प्रश्नांचे स्वरूप काय असले पाहिजे आणि महिला धोरणांची व्याप्ती काय असावी?

 महिला चळवळीचा मंच हा काही जगातील यच्चयावत प्रश्न, अगदी इतर अनुभवी तज्ज्ञ संस्थांनी निर्णय घेतलेले किंवा घेण्याचे प्रश्नसुद्धा उघडण्याचा आखाडा नव्हे. उदाहरणार्थ, शहरातील स्त्रिया दुपारी घरी असल्या म्हणजे पुष्कळ वेळ टेलिफोनवर निरर्थक बोलत राहातात. त्यांच्या टेलिफोन संभाषणाला त्या वेळी चालू असलेल्या, व्यापारी, औद्योगिक, प्रशासकीय संभाषणांना लागू असलेलाच दर लावणे योग्य नाही आणि असे मत संमेलनातील शहरी स्त्रियांचे असणे साहजिक आहे. पण, या प्रश्नावरचा निर्णय हा देशातील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर (तार) दूरसंचार योजनेच्या मान्यवर संस्थांनी हाताळण्याचा आहे, स्त्रियांची परिषद ही कितीही व्यापक आणि जागतिक असली तरी त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार त्या परिषदेला नाही. स्त्रीपरिषदांचा आणि संमेलनांचा वापर सर्वसाधारण भले आणि स्त्रियांचे भले यांची दिशा आणि अंश यांत जेथे फरक पडतो अशा विषयांच्या प्रश्नांच्या अभ्यासासाठी झाला पाहिजे. पंजाबात अलीकडे उत्पन्नाची वाढ झाली पण त्यामुळे स्त्रियांचा दर्जा सुधारण्याऐवजी तो खालावला. यंत्रांचा वापर वाढला, पण त्याचा पुरुषांना जितका फायदा झाला तितका स्त्रियांना झाला नाही. अशा प्रश्नांवर महिला मंचांनी विशेष लक्ष दिले पाहिजे. अशा प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याने मुखंडींचा स्वार्थ कदाचित साधत असेल; स्त्रियांचे भले होण्याची काहीही शक्यता नाही.

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १२१