पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

श्रमविभागणीची व्यवस्था संपवायची असेल तर खुलीकरण हा एकच मार्ग संभवतो. हे लक्षात घेतले तर स्त्रियांची म्हणवणारी जागतिक परिषद खुल्या व्यवस्थेऐवजी नियंत्रित व्यवस्था शिरोधार्य मानते याचे अद्भूत वाटल्याखेरीज राहत नाही.
 दुर्दैव असे की साधी, सरळ, सोपी उत्तरे उपद्व्यापी मंडळींना आवडत नाहीत. त्यांना स्वारस्य प्रश्नांची उकल करण्यात नसते, प्रश्नांच्या निमित्ताने स्वत:चे भले करण्याची त्यांची धडपड असते.
 खरे म्हटले तर, गरिबांची अपेक्षा एवढीच होती की जगाने त्यांना पायदळी तुडवू नये, त्यांच्या छातीवरून उठावे. पण तरीही 'गरिबी हटाव' च्या निमित्ताने एक मोठा भरभराटीचा जागतिक उद्योगधंदा उभा राहिला. त्यामुळे, 'लोकसंख्या-नियोजनाचा सर्वोत्तम उपाय संपन्नता आहे' हा इतिहासाचा धडा बाजूला ठेवून कैरो परिषदेने कुटुंबनियोजनाची साधने आणि तंत्रे यांच्या प्रचारावर भर दिला. महिला मुखंडींनाही त्यांच्या त्यांच्या संस्थांची आणि कार्यक्रमांची वाढ व्हावी, स्त्रियांच्या हालाखीचे भांडवल करून, अशीच तळमळ दिसते. या कामात त्यांना आता वेगवेगळ्या देशांची सरकारे आणि आंतरराष्ट्रीय संस्था यांचीही साथ मिळाली आहे.
 आकडेमोडीतील हातचलाखी

 सदस्य राष्ट्रांना विकासासाठी मदत करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघात एक साहाय्य कार्यक्रम (UNDP) स्थापन करण्यात आला. या संस्थेने बेजिंग परिषदेच्या मुहूर्तावर एक नवी आकडेवारीची मांडणी पेश केली. या मांडणीत तीन नवे निर्देशांक आकडेमोड करून दाखविण्यात आले. सर्वसाधारणपणे, राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा हा कोणत्याही देशाच्या विकासाचे गमक मानले जाते. पण, विकासाचे मोजमाप केवळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधाराने न करता साक्षरता आणि आयुष्यमान हे लक्षात घेऊन विकासाचे मोजमाप केले तर, राष्ट्रीय उत्पन्न जास्त असलेले अनेक देश या मानवी विकास निर्देशांकाप्रमाणे (माविनि) खालच्या पायरीवर येतात. साक्षरता आणि आयुष्यमान हे लक्षात घेतांना पुरुषांची परिस्थिती आणि स्त्रियांची परिस्थिती ही वेगळी तपासली आणि स्त्रियांची साक्षरता व जीवनमान यांच्या आधाराने नारी विकासाचा (नाविनि) एक वेगळा निर्देशांक काढता येईल. याखेरीज, प्रत्येक देशात अधिकाराच्या आणि सत्तेच्या जागांवर असलेल्या महिलांचे प्रमाण किती हे लक्षात घेऊनही स्त्रियांच्या सक्षमीकरणाचा एक निर्देशांक (नासनि) बनवता येईल. संयुक्त राष्ट्रसंघाच्या साहाय्य कार्यक्रमाने जेथे जेथे आकडेवारी उपलब्ध होती तेथे तेथे या तीन निर्देशांकांची सिद्धता

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १२३