पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सहा


बेजिंग परिषदेचा अर्थ आणि इशारा



 प्रास्ताविक
 बेजिंग येथे १९९५ च्या सप्टेंबर महिन्यात चौथी जागतिक महिला परिषद भरली. या परिषदेकडे एरवी कोणाचेही लक्ष गेले नसते. पण अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी हिलरी क्लिंटन परिषदेस हजर राहिल्या आणि आपल्या भाषणात त्यांनी चीनमधील मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या प्रश्नावर बरीच धूळ उडवली; शिवाय चिनी अधिकाऱ्यांनी गैरसरकारी संघटनांची महिला परिषद बेजिंगहून हलवून ५० कि.मी. दूर असलेले हुयारू या गावी नेली आणि तेथील व्यवस्थेत खूप गोंधळ माजवला. यामुळे बेजिंग परिषदेची प्रसिद्धी झाली. बेजिंगमध्ये मोठ्या थाटामाटात अधिकृत सरकारी परिषदेने जाहीर केलेले 'कृतिपीठ' किंवा गैरसरकारी संघटनांच्या परिषदेने तयार केलेले 'घोषणापत्र' याकडे सर्वांनी दुर्लक्षच केले; त्यावर काहीही चर्चा घडलीच नाही. जणू काही सर्वसाधारणपणे अशी काही परिषद झाली याची जाणीवच कोणाला नव्हती किंवा तेथील चर्चा आणि ठराव याकडे लक्ष देण्यात काहीही अर्थ नाही अशी सर्वसाधारण धारणा असावी. मधून मधून स्त्रियांना 'तोंडाची वाफ' मोकळी करण्याची संधी जागतिक परिषदेच्या प्रकाशझोतात मिळाली म्हणजे बरे असते! आता त्या पुढील परिषदेपर्यंत गप्प राहतील." अशी जगातील जाणत्यांची या परिषदेविषयी भावना असावी.

 बेजिंग येथील परिषद ही जागतिक महिलांची चौथी परिषद. पहिल्या परिषदेपासून आजपर्यंत महिला चळवळीची आणि महिलांचीही सतत पीछेहाट होते आहे असे वाटते. १९७५ साली मेक्सिकोत पहिली जागतिक महिला परिषद भरली त्या वेळी आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि व्यक्तिमत्त्वाच्या तेजोवलयांनी झगमगणाऱ्या महिला नेत्यांचे तारांगण जमले होते. मार्क्सवादी विचारांचा पाया खिळखिळा करून टाकणाऱ्या कार्यकर्त्या, लेखिका, विचारक यांनी मार्क्सवादी

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ११६