पान:चांदण्यातील गप्पा.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७२
चांदण्यांतील गप्पा

रंगांची वर्षे नेसून चालल्या आहेत, त्या वस्त्रांची प्रभा आकाशपंथावर पडून हा भाग मनोरम दिसत आहे ! किंवा, कृष्णतुलेकरितां त्याच्या सोळासहस्र स्त्रियांनीं आपल्या सर्व अलंकारांची रास देवर्षीपुढे करून ठेविली आहे ! डोंगरावरून खाली प्रवाहांत येणाऱ्या नदीकडे पाहिले म्हणजे असे वाटे की, कृष्णस्त्रिया सजल नेत्रांनी कृष्णाचें मोठ्या काकळुतवाणीनें परतदान मागत आहेत. त्यांच्या नेत्रांचे पाणी एकवटून त्याचे भले मोठे ओघ होऊन डोंगरावरून खाली येत आहेत ! किंवा नारदाचे हातावर कृष्णदानाचे सत्यभामेने जे उदक सोडिले त्याचीच ही धार आहे !

 ताडांचे शेंडे व डोंगरांचीं शिखरेंच तेवढीं सोनेरी दिसत होतीं. ती एखाद्या सुवर्णगुच्छाप्रमाणे शोभत असून कृष्णस्त्रियांनी आपल्या महालांत शोभेकरितां टांगलेले सुवर्णपुष्पगुच्छ, कृष्णाचा वियोग होणार म्हणून, तेच मृत्युलोक येत असत तुम्हांस दिसत आहेत, असे भासे. आभाळाच्या काळ्या ढगाच्या खालून पांढरेशुभ्र पक्षी उडत, ती जणूं पूजासमयीं सत्त्यभामेनें पांढरी पुष्पें घेतली होती ती द्वारकेतल्या वान्याने उडवून दिली आहेत; त्याचा हेतु हाच कीं, पूजासाहित्याचा अशा प्रकारें नाश केल्यानें तरी कृष्णदानाचें अपवित्र काम लांबेल ! हिरवे, तांबडे, पिवळे, जावळे, निळे ढग व त्यांच्या कडा चकचकीत हिरेजडित, क्वचित् शुभ्र रुप्याच्या क्वचित् नीलमण्याच्या, पाचेच्या, माण- काच्या, वैडूर्याच्या, पुष्कराजाच्या वगैरे पाहून परमेश्वराच्या अगाव चातुर्याची कल्पना होऊन मन थक्क होई !

 हे आभाळांतील देदीप्यमान रंग पाहून असें वाटे कीं, द्वारकापुरीस भावी कृष्णवियोगाचें दुःख असह्य होऊन ती दुःखभराने द्विधा झाली व तिचे पोटांतील या वरील नवरत्नांच्या खाणी उघड्या पडल्या आहेत ! अथवा द्वारकेस कृष्णवियोगाची नुसती कल्पना असह्य वाटून तो विदेही होऊन आपले सर्व भांडार तिनें दान देण्यास बाहेर काढिले आहे ! किंवा सर्व जणांची संपत्ति कृष्णस्त्रियांनी कृष्णतुलेकरितां गोळा केली, तिच्या जणूं या राशी दिसत आहेत ! असे नाना तरंग मनांत उठत व तो अलौकिक देखावा पाहून जो आनंद होई तो गगनांत मावणार नाही असे वाटे, काय ही सृष्टिची संपत्ति ! काय र्हे तिचॆं चातुर्थ ! या सर्व चमत्कारांपुढे आपण मनुष्यप्राणी किती क्षुद्र !