पान:चांदण्यातील गप्पा.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लावण्यवती

७१

मात्र जात. घोडी व कांहीं बैलगाड्या करून आम्ही निघालों. आमच्याबरोबरची मंडळी चांगली शंभर दीडशें होती. आम्ही बन्याच यात्रा करण्याच्या विचारानें घराहून निघालों होतों. प्रवासांत असतां एकदां आम्ही एका डोंगराच्या पायथ्याशीं संध्याकाळी आलों. ते दिवस पावसाळ्याचे होते. पाऊस नुकताच पडून गेला होता. आभाळातले ढग एकमेकांपासून सुटून निरनिराळे झाले होते. वृक्ष, वेली, डोंगर व खालची जमीन हिरवीगार व टवटवीत दिसत होती. सूर्यनारायण पश्चिम बाजूला समुद्राकडे वळला होता. त्याचीं तीं सोन्यासारखी व लांवट किरणें पूर्वेच्या डोंगरावर फारच नामी दिसत होतीं. आरशाचा कवडासा एखाद्या अंधेच्या खोलींत पाडल्यावर उजेड पडून जसा त्या खोलीचा आंतला भाग दिसतो तसा त्या डोंगराचा भाग स्पष्ट दिसत होता. त्याच्या खोल खोल दऱ्या अगदी चांगल्या स्पष्ट दिसत होत्या एवढेच नव्हे, पण फार सुंदर दिसत होत्या. जसे एखाद्या दुर्जना पश्चात्तापपूर्वक आपल्या गुरूजवळ आपले खोल काळें अंतःकरण उघडावें, त्याप्रमाणे डोंगरानें खाचा, खळगे गुहा • वगैरे आपले सर्व भाग सूर्यापुढे व्यक्त केले होते.

 गुरुप्रसादानें जसे पाप्याचें अंतःकरण शुद्ध व निर्मळ व्हावे, त्यासारखे सोनेरी सूर्यकिरणांनी तेच डोंगराचे भाग खुलून दिसत होते. पश्चिमेकडे आभाळीत निरनिराळ्या आकाराचे व चित्रविचित्र रंगाचे ढग हळूहळू वर येत होते. ते सोनेरी, रुपेरी, तांबडे, पिवळे, जांभळे, हिरवे, निळे, ढग मोठे गमतीचे दिसत होते. त्यांचे आकार मोठमोठ्या वाड्यांसारखे, किल्ल्यांसारखे व देवळांसारखे दिसत होते. ते पाहून मनांत येई कीं, श्रीकृष्णाची जी सोन्याची द्वारका समुद्रांत बुडविली तीच आज तरंगून वर येत आहे ! तींतील सुवर्णाचीं व नवरत्नांचीं कृष्णमंदिरें दिसत आहेत ! डोंगराच्या बाजूला मध्ये आभाळांत इंद्रधनुष्य पडले होते, ते जणूं त्या सुवर्णनगरींत शिरण्याची रत्नजडीत वेस आहे. उत्तरेच्या व दक्षिणेच्या बाजूला जे अनेक झगझगीत रंगांचे ढग दिसत ते त्या नगरीतील श्रीकृष्णाचीं रत्नखचित विहारस्थळे आहेत; अथवा, सत्यभामेनें वेडगळपणानें देवर्षि नारदास श्रीकृष्णाचें दान केल्याची बातमी इतर कृष्ण- स्त्रियांना कळतांच त्या लगबगीनें दान केल्याजागी जमत आहेत व त्यांच्या अंगावरील रत्नांचे दागिने ठिकठिकाण गळून पडले आहेत, म्हणूनच जणों ह्या आकाशपंथ एवढा देदीप्यमान झाला आहे ! किंवा, त्या स्त्रिया निरनिराळ्या