पान:चांदण्यातील गप्पा.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५६
चांदण्यांतील गप्पा

भोंवतालचा देखावा मोठा बहारीचा दिसत होता. आकाश ढगांनीं व्याप्त झाले होतें. झिम्झिम् पाऊस पडत होता. तळे अगदी भरून वाहात होतें. एका बाजूला जी माणसांनी जाण्याकरितां वाट ठेविली होती, त्या पुलावरून तळ्याचें पाणी अंबील ओढ्यांत पडत होते. ते खूप मोठ्या शुभ्र पांढऱ्या वस्त्राप्रमाणें अथवा दुधाच्या धारा पडत असल्याप्रमाणे दिसत होतें. अंबील ओढयाचे पाणी साधारण गढूळ तांबूस रंगाचें झालें होतें. ओढ्यांत मधूनमधून काळेभोर खडक दिसत, ते जणूं हत्तीचीं पिलें जलक्रिडा करीत आहेत असे भासे. त्या खडका भोंवती उगवलेली कमळे हीं जणुं त्या हत्तीच्या छाव्यांनीं लीलेने उपटून आपल्या शरीराभोंवतीं विखरून टाकावीं त्याप्रमाणे शोभत होती. तें गढूळ झालेले पाणी त्या इत्तींनी खिदळून गढूळ करावे त्यासारखे दिसत होते. पुण्यनगरींत पूर्वीप्रमाणे सजीव इत्तीचा संचार स्वप्नवत् झाल्यामुळे त्या पूर्ववैभवांतील हत्ती अंत्रील ओढ्यांत पाषाणभूत होऊन, भ्रमानें कां होईना पण क्षणभ लोकरंजन "ण्यास तेथे राहिले आहेत, असे मनास वाटल्यावांचून राहात नसे.

 ओढयाच्या दोन्ही बाजूंच्या बागांचीं व शेतांचीं कुंपणे रानवेलींनीं व झुडपांनी हिरवीगार झालीं होतीं. मधून मधून जे मोठमोठे जुनाट वृक्ष होते ते आणि त्यावर चढलेल्या कोमल वेली, म्हातारा नवरा व तरुण बायको यांप्रमाणे विजोड जोडपी दिसत. त्यांवर आलेली फुले, वृद्धपणाच्या द्वितीय संबंधापासून झालेल्या लाडक्या मुलाप्रमाणे आपल्या आईबापांच्या अंगावर लडिवाळपणानें लोळत व बागडत आहेत असे वाटत होते. निवडुंगांवर देखील सुंदर वेली पसरल्या होत्या; त्यांच्यामुळे तें कांटारे निवडुंग सज्जनांच्या संगतींत एखादा दुर्जन जसा क्षणमात्र सज्जनवत् भासतो, त्याप्रमाणे त्या सुंदर वेलींच्या सहवासानें त्या दुर्जनांनाही शोभा आली होती ! तळ्याच्या काँठचे जुने वृक्ष, पर्वतीप्रमाणे पुण्यनगरीची वारंवार होणारी उन्नति व अवनति अवलोकन करून, दुःखित अंतःकरणाने व सजल नेत्रांनी आलेल्या प्रसंगास पाठ देऊन आपला सहनशीलपणा जगाच्या निदर्शनास आणीत होते.

 आम्हीं पर्वतीला जाण्यास निघालों त्यावेळी तिसरा प्रहर झाला होता. आभाळांत काळेभोर ढग जमत चालले होते व मधून मधून वीजही चमकत होती. जसा चांगला विचार एखाद्या नीच दुर्जनाच्या अंतःकरणांत उद्भवून निमिषार्धीत