पान:चांदण्यातील गप्पा.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वनवास

४९


सुशील, सद्गुणी, सुस्वरूप, व पतिनिष्ट अशी होती. दोघांचें प्रेम अप्रतिम होतें. परमेश्वरकृपेनें मला पैशालाही कांहीं कमी नव्हते. आमची ' ती ' सूनबाई वयांत येण्याच्या अगोदरच वारली होती तरी मला त्याबद्दल कांही वाईट वाटत नव्हतें. मी सुखांत होतों एवढेच नव्हे, पण इहलोकीं ज्याला सुख म्हणत असतात त्या सुखाच्या अगदी शिखरावर होतो. माझा मुलगा व मी घरांत अगदी एका विचा- रानें होतों. एकच उणीव होती ती ही कीं, गृहरत्नांच बालकम् ' म्हणतात तें गृहरत्न फार दिवस माझें घरांत नव्हते, पण ही उणीवही परमेश्वरानें दूर केली. माझ्या सुखाला आणखी थोडी भर पडली (चंपेकडे वोट करून ) ती दी. नातवंड देवदयेने माझे दृष्टीस पडले. मग तर काय ? मला मजसारखा सुखी प्राणी या त्रैलोक्यांत नाहीं असे वाटू लागले. मी संसारानंदीत डुलूं लागलो. पण हा माझा आनंद, हे माझे वैभव, दैवाला सहन झाले नाहीं. माझ्या मुलाच सच्छील, सद्वर्तन, दयाभूतपणा, माझ्या सुनेचें सौंदर्य व सदाचरण, ही तेथल्या लोकांना, विशेषेकरून तेथल्या मुसलमान देशमुखाला, पाहवलीं नाहींत. तो आमचा फार द्वेष करी. परंतु आम्ही म्हणत असू, करीना वापडा, आपण नीट रीतीने वागल्यावर तो काय करणार ? ' पण सत्ताधारी तो. सर्व गांवाची त्याला अनुकूलता, आणि काळ हा असा चमत्कारिक मुसलमानांची नेहमीं सरशी व्हावयाचीच. एखादा गुन्हेगार असो वा नसो त्याचा नायनाट करावयाचा म्हटलें म्हणजे पाहिजे त्या रीतीने करावयाचा. त्याला एकदां मोठ्या रकमेची गरज लागली. खरी गरज लागली किंवा भांडण उकरून काढण्याकरितां त्यानें ढोंग केले देव जाणे ! गांवांत माझ्या पेढीएवढी मोठी पेढी दुसरी कोणाचीच नव्हती, तेव्हां तो मुसलमान ( त्याचें नांव लालखां होतें ) माझ्या मुलाकडे आला. मुलगा ओसरीवरच्या झोपाळ्यावर वसला होता व सूनबाई चंपेला कडेवर घेऊन उभी होती. एवढ्यांत तो तेथे आला. त्यासरशी ती आंत निघून गेली, व मुलगा मियासाहेबांना घेऊन पेढीवर गेला. परंतु तो दुष्ट चांडाळ ! अधमच तो ! सून- बाईचे अप्रतिम सौंदर्य त्याचे दृष्टीस पडतांच त्याचे मनांत दुष्ट वासना आली. असे वाटतें. पेढीवर गेल्यावर रकमेसंबंधी दोघांची बोलाचाली झाली. त्याचें याचे व्याजासंबंधानें व पैशाला तारण लावून घेण्यासंबंधाने एक मत होईना.

 दोघांची बाचाबाची झाली. तो रक्कम घेतल्याशिवायच चालता झाला. येथपर्यंत झाले ते इतर चार लोकांशी होतें तसेंच झाले. त्यांत आम्हांला कांहीं