पान:चांदण्यातील गप्पा.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वनवास

४५

आला आणि अत्यंत नम्रपणाने चंपेला म्हणाला:- " मुली, तूं कोण" या वनाची वनदेवता की स्वर्गीची अप्सरा ? कोणीही असलीस तरी माझी विनंती इतकीच आहे कीं, देवी, आजची रात्र मला या वनांत आश्रय दे."

 हे शब्द कानीं पडतांच चंपा अगदीं घाबरली. तिने आजपर्यंत खंडूजी व माझा आजोबा यांशिवाय चांगल्या स्थितीतले तिसरें माणूस मुळींच पाहिले नव्हते. कातकरी, ठाकूर वगैरे रानवट जातींतले पुरुष, बायका व मुळे तिनें पुष्कळ पाहिलीं होतीं; पण असला अंगांत मोठा झगा, पायांत विजार, चढाऊ जोडा, डोकीस मंदील, कमरेस तरवार लटकते आहे, तिच्या मुठीला सोने झळकत आहे, खांद्यावर बंदूक टाकली आहे, तिच्या दसत्याला सुंदर इस्तिदंती नक्षी केलेली आहे, कंबरेला शेला बांधलेला असून त्याचा जर झगझगत आहे, असा पुरुष तिनें कधींच पाहिला नव्हता. स्वतां त्या पुरुषाचें सौंदर्य पाहून तर तिला कांहीं चमत्कारिक वाटलें. कांहोंसे बरे वाटणारे व कांहींसे विषाद वाटणारे विकार तिच्या मनांत उद्भवूं लागले. वर तोंड करून त्याचा चेहेरा पाहण्याचेही तिला धैर्य होईना, व पाहण्याविषयींची उत्सुकताही कमी होईना. त्याच्याश बोलावे म्हणून तिच्या ओंठापर्यंत शब्द येत, पण तेथें येऊन पोहोंचले की ते थबकत. वर मान करून आतां मात्र त्याला खास उत्तर द्यायचें असा निश्चय तिचें अंतःकरण करी, पण डोळ्यांच्या व ओंठाच्या दुराग्रहापुढे त्या विचारीचा निश्चय जागच्या जागींच राही.

 याप्रमाणे कांहीं वेळ स्थिति झाली. तिची पाण्याची घागरही आता भरून सांडूं लागली, व कोल्हे व्याघ्रादिकांच्या आरोळ्या कानीं येऊं लागल्या. त्यासरशी ती थोडी भानावर येऊन व धैर्य धरून घागर डोकीवर घेऊन चाळतां चालती त्या गृहस्थास म्हणाली, "माझ्यामागून या. आजोबांनी दिला आश्रय तर विचारा-~-" एवढेच शब्द तोंडांतून कसेतरी तिने एकदांचें काढले व घागर घेऊन ती झपझप पावले टाकू लागली.

 चंपा एकटी रात्रीची टांक्यावर गेलेली अजून कां येत नाही म्हणून आजोबा खाटेवरून उठून दारांत तिची वाट पाहात बसले होते, व खंडूजी नुक्ताच हातांत काठी घेऊन व पायांत वहाणा घालून चंपेच्या शोधार्थ निघाला होता. तो एका हांकेवर गेला असेल नसेल तोच चंपा व तिच्यामागून तो गृहस्थ अशीं