पान:चांदण्यातील गप्पा.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वनवास

४१

नसत व रात्रंदिवस ' आता माझ्या चंपेचें कसे होईल' हा जप करीत वसत. मानजीवराव अगदी थकल्यामुळे खंडूजीला शेताचें सारें काम एकटयाला करावें लागे, व घरांतील सर्व काम चंपा करी.

 सुवर्णगिरीवर सर्व प्रकारच्या वनस्पतींची अगदी गर्दी होती. कांहीं कांहीं वृक्षांची तर सूर्यकिरणाला अडथळा करण्यांत अगदीं चढाओढ लागली आह असें वाटे. या उंचीच्या कामांत भेरळी, ताड व साग यांनीं खरोखर आपला नंबर वर लाविला होता. आम्रवृक्ष बिचारे त्यांची स्पर्धा करण्यास उंच पाय करून यत्न करीत, पण माणसांप्रमाणे त्यांची फजिती होऊन ते लवकर दमून बैठक घेत ! ताडांची बरोबरी करणारें या डोंगरावर दुसरे कोणीच नव्हते.

 या वनांत अनेक तऱ्हेचे वृक्ष व वेली होत्या, व त्यांचे एकमेकांशी सख्यही चांगलें होतें. ती सर्व मिळून आपल्या अपत्यांचा सांभाळ करीत मोठमोठया वृक्षांच्या फांद्या एकमेकांत घुसल्यामुळे असे वाटे कीं, दोघेचौघे जिवश्च कंठश्च स्नेही एकमेकांचे हात धरून चालले आहेत, मोठमोठया वेली वृक्षावर चढून त्यांचा विस्तार वर पसरल्यामुळे असे वाटे कीं, ही अत्यंत लाडकी कन्या लडि वाळपणाने आपल्या बापाच्या अंगावर लोळण घेत आहे ! पाने वाळून पांढरी झाल्यामुळे साग जसे सर्वसंगपरित्याग करून शुभ्र वस्त्र परिधान करून तपाचरण करीत आहेत ! आम्रवृक्ष, फणस, जांभळी यांच्यासारखे सदोदित डवरलेले वृक्ष एखाद्या अल्पायासानें द्रव्यलाभ व कीर्तिलाभ झालेल्या पुरुषाप्रमाणे उन्मत्त व आपल्याच घमेंडींत असल्यासारखे दिसत ! मिरवेली, नागवेली व कुसरी यांची अत्यंत मैत्री असून त्या लहान लहान खेळांतले मंडप घालीत. जणूं काय त्या कोणाच्या लग्नाचीच तयारी करीत आहेत ! बोरी, पळस व रानकेळी यांच्याकडे पाहिले तर विचाऱ्यांना संसारांत सुख फार थोडे असेल असे दिसे. कारण तीं झाडे म्लान व चिंताक्रांत अशी दिसत. विशेषेकरून संपत्ति किती चंचल आहे तिचा किती भरंवसा धरावा-हें तरी त्यांना फार चांगले माहित झाले असावें, असें वाटे. संपत्ति असल्यावर लोक आपल्याला कसे मान देतात व ती गेल्यावर ते आपला घडोघडी कसा पाणउतारा व अपमान करितात, याचा बिचाऱ्यांना वारंवार अनुभव आल्यामुळे 'जग हे असेंच आहे' धरून चालणारी- पैकीं तीं होतीं.