पान:चांदण्यातील गप्पा.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गोष्ट तिसरी,
"वनवास."


 सध्याकाळी ठरल्याप्रमाणे आम्ही सर्वजण गोष्ट ऐकण्यास आपापल्या जागीं येऊन बसलों. आजची गोष्ट सांगणारे गृहस्थ म्हणाले: 'मला वोवा गोष्ट सांगायला कांहीं येत नाहीं; पण घरांतील जुनीं दप्तरें चाळीत असतां, मला हाताने लिहिलेली एक गोष्ट सांपडली आहे. ती मी तुम्हांस पाहिजे तर वाचून दाखवितों. ' सर्वोनी होय म्हटल्यावर त्यांनी आपले ते धुरकट रंगाचें जुन्नरी लांब लांब कागदांचे विंडोंळे खिशांतून काढिले. त्यांनी आपली चाळिशी उपरणीच्या पदराने पुसून नाकावर चढविली व दिवा सरसावून वाचण्यास आरंभ केला.

 त्यांची गोष्ट फार जुन्या भाषेंत होती, ती मी चालू वहिवाटींतल्या भाषेत उतरून घेऊन आपल्यापुढे ठेवितें.

 'सुवर्णगिरी नांवाच्या पर्वतावर एक म्हातारा गृहस्थ व एक लहान पण फार सुंदर मुलगी अशी एका झोंपडीत राहात असत. म्हाताच्या गृहस्थानें झोंपड्या- भोंवतींच कांहीं जमीन लागवडींत आणिली होती. तींत तो व त्याचा एक चाकर पोटापुरतें धान्य व भाजीपाला तयार करीत. म्हातारा आपल्या त्या लहान मुलीला एक क्षणभरही विसंबत नसे. तो आपल्या परसांत काम करण्यास गेला म्हणजे मुलगी तेथे एखाद्या झाडाखाली पानाच्या पिपाय करून वाजवीत बसे. कधीं निरनिराळ्या रंगांची फुले वेंचून आपल्या डोकींत घाली; कधीं कधीं चिंध्या गोळा करून त्यांच्या वाहुल्या करून त्यांच्याशी खेळे; व केव्हां केव्हां आपल्या आजोबाबरोबर ( कारण तो म्हातारा गृहस्थ तिचा आजोबा होता ) परसांत वाढ- लले गवत खुरपण्यास मदत करी. तिची मदत ती काय असणार ? कुठे एखादे वेळ परसांतली भाजी तोडून आणावयाची; कुठे जेवणाचे जागेवरचा केर काडून डाकावयाचा व आपल्या आजोबाचा आणि आपला पाट मांडून घ्यावयाचा:-