पान:चांदण्यातील गप्पा.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६
चांदण्यांतील गप्पा

तांगे कोणाचे हे पाहण्यास उत्सुक झालेल्या माणसांची सभोवती गर्दी झाली. आनंदरावाची बायको, दोन मुलें गडीमाणसें व स्वतः आनंदराव इतकी मंडळी तांग्यांतून उतरून देवळांत शिरली. देवदर्शन घेऊन विन्हाडी गेली.

 त्या दिवशी आनंदरावाचे बायकोनें संक्रांतीचा वाणवसा जो केला तो त्या खेडगांवच्या लोकांना अद्याप स्मरत आहे. आनंदरावांनी आपल्या बायकोकडून नारळ, खारका, सुपाया वगैरे पदार्थ लुटविले. त्याचप्रमाणें गरीबांच्या मुलांना ओगढी टोपरी, वायकांना लुगडी चोळ्या, व पुरुषांना धोतरें घोंगड्या वांटल्या. आनंदराव आपल्या शेजाऱ्याापाजाऱ्यांना " केरोबा विठाबाचा मी आनंदा बरें का ! " असे सांगे. ज्यांच्या घरीं तो जेवी खाई त्यांचे उपकार त्यानें आपल्या शक्तीप्रमाणे देणग्या देऊन फेडले; व ज्या मारुतीच्या पुढचे जिन्नस तो चोरून खात असे त्या देवाच्या देवळास त्याने सुरेखसा सभामंडप बांधण्या- करितां गांवच्या संभावित लोकांजवळ रक्कम ठेविली.

 इतकी गोष्ट सांगितल्यावर ‘ आतो रात्र फार झाली व उद्यां सकाळींच कचेरींत शिलकी पडलेले काम करण्यास जावयाचें आहे' असे म्हणून, च एकदां तंबाकूचा शेवटचा बार भरून, आमचे धोंडोपंत उठले व आम्हीही आपापल्या झोपडींत निजावयास निघून गेलों.