पान:चांदण्यातील गप्पा.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२
चांदण्यांतील गप्पा

पणानें व प्रेमानें वागे. पण तो दुसरा माणूस ( त्याचें नांव तुळशीराम ) आनंदावर काहीं तरी किचाट आणून केन्हा एकदां त्यास खड्यांत घालीन म्हणून संधि पाहात होता.

 तुळशीराम हा शेटजींच्या एका जुन्या चाकराचा मुलगा होता. बापाला काम होईनासे झाले म्हणून त्याने मुलाला कामावर ठेवला व आपण घरीं बसला.

 बारीकसारीक गोष्टींत एक दोन वेळां तुळशीरामाची लवाडी आनंदाच्या लक्षात आली; व तो गयादिनाला भेटावयास गेला, तेव्हा त्याने त्याच्याजवळ ते सांगितले. पण गयादिनानें त्याला उलट असा उपदेश केला कीं, असल्या बारीकसारीक गोष्टींकडे तूं लक्ष देतोस हे चांगले नाहीं. कदाचित् ती गोष्ट त्याचेकडून चुकून झाली असेल. आपण आपले अंतःकरण चांगले स्वच्छ गंगोदकाप्रमाणे ठेविलें म्हणजे त्यांत कांटेया निवडुंगाचेंही प्रतिबिंब सुंदर दिसतें; व आपलें अंतःकरण गढूळ नाल्यासारखे असले तर सुंदर आम्रवृक्षांचें प्रतिबिंबद्दी हिडिस दिसतें. तुला त्याची लबाडी वाटली, हा तुझ्या मनाचा वाईटपणा आहे व त्यामुळे तुला त्याचें कृत्य वाईट दिसलें.

 असें गयादिनाचे बोलणे ऐकून आनंदा निरुत्तर झाला. एकदां जम्ना- दास आनंदाबरोबर बाहेर हिंडावयाला गेला होता. परत येतांना आनंदाचे खांद्यावर त्याला झोंप लागली. आनंदाने घरी आणून त्याला बिछान्यावर निजविलें व तो आपल्या कामास गेला.

 जम्नादास जागा झाल्यावर साखरबाईकडे गेला. तिने त्याचे कपडे काढले, तेव्हां त्याच्या गळ्यांत कंठी नाहीं असे तिला आढळले. तिनें अंथरुणांत वगैरे पाहिली, दुसरीकडे शोधली, पण कंठीचा पत्ता लागेना. शेवटी आनंदाला विचारिलें. त्यानें सरळपणानें आपल्याला ठाऊक नसल्याचे सांगितले व तोही शोधूं लागला. तुळशीरामाला विचारिलें, तों तो म्हणाला, ' मी कशाला पाहूं ? आनंदा त्यांना बाहेर घेऊन गेला होता. तोच त्यांना खेळवतो, त्याला विचारा.

 पुष्कळ शोध केला, पण कंठीचा कांहीं पत्ता लागेना. घरांतील सर्व चाकर- माणसे जुनींच होतीं. फक्त आनंदा मात्र नवीन राहिलेला. शेट व शेटाणीस यांशिवाय सगळ्यांना आनंदाचा वहीम येऊं लागला.