पान:चांदण्यातील गप्पा.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६
चांदण्यांतील गप्पा

तुला उभा करते. तेथे तुजकडे पाहून त्वेषानें लोक कपाळास आंठया घालते तूं तुरुंगात केव्हां जाशील याची ते वाट पाहात बसते. अशा वेळीं तुला कोणी सोडवावयाला वगैरे नाहीं असें पाहून तुला कृतकर्माचा पश्चात्ताप झाला असता. पण तेव्हां त्याचा काय उपयोग ? बुडणारा जोपर्यंत पाण्याच्या धारेंत सांपडून गिरक्या खाऊं लागला नाही, तोपर्यंत त्याला बचावण्याचे यत्न साध्य होतात. एकदां भोवऱ्यांत सांपडल्यावर मग काय ? त्याप्रमाणे तुझी स्थिति झाली असती पण आतां शहाणा हो. हे जिन्नस चोरल्याबद्दल देवाची व गुरवाची पश्चात्ताप पूर्वक क्षमा माग; आणखी येथून पुढे अशा कृत्याला प्रवृत्त होऊं नको.

 गयादिनाचे बोलणे ऐकून बिचाऱ्या आनंदाला रडेंच कोसळले. त्याने ते जिन्नस खाली ठेवून आपल्या फाटक्या कोटानें तोंड झांकून घेतले. त्याला आपले तोंड कोणाला दाखवूं नये असें झालें. तो किती वेळ तरी गुढग्यांत डोकें घालून व कोटानें तें झोकून घेऊन बसला !

 आनंदाची अशी स्थिति झाली हे पाहून गायादिनासही गहिंवर आला त्यानें त्याला पोटाशी धरिले आपल्या धोतराने त्याचे डोळे पुसले व त्याल म्हणाला. " आनंद ! तूं फार चांगला मुलगा आहेस. मुला तुजकडून झालेल्या अपराधाचा तुला पुरा पश्चात्ताप झाला आह. तेव्हां तूं देवाची प्रार्थना कर. पुनः असे करणार नाहीं, अशी शपथ घे, आणि हे पैसे आणि हे जिन्नस ज्याचे त्याला परत दे, त्याची क्षमा माग आणि या माझ्या झोपडींत येऊन राहा. मला जी कांही अर्धी भाकर मिळते आहे, त्यांतील तुला चतकोर देईन. आतां तुझ्या या कृत्याबद्दल देवाची क्षमा मागूं व नंतर आपण फराळ करूं. "

 आनंदाने तोंड वर केलें तों त्याचे डोळे लाल झाले होते व तोंड अगदी उतरून गेले होते. गया दिनाने सांगितल्याप्रमाणे त्याने देवाची प्रार्थना केली व क्षमा मागितली, व याउपर आपल्याला सद्बुद्धि दे असें देवास विनविलें. त्याचें अंतःकरणापासून कळवळ्याचे कृत्य होते हे पाहून गयादिनास फार फार समाधान वाटले. प्रार्थना झाल्यावर आणलेल्या पदार्थांचा त्या दोघांनी फराळ केला. नंतर दोघे गुरवाच्या घरी त्याचे जिन्नस त्याला देऊन त्याची क्षम मागावयास गेले.