पान:चांदण्यातील गप्पा.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४
चांदण्यांतील गप्पा

 गयादिनाची झोंपड़ी सडकेच्या उजव्या अंगास पुलापासून सरासरी तीन चारशें पावले एका शेतांत होती. झोपडी केवळाची होती. सभोवती कारव्यांचा कूड होता. झोपडीला पुढे एक लहान पडवी उतरली होती. पडवीच्या अंति गेल्यावर एक माजघर, त्यांत एक खोली व पलीकडे एक स्वयंपाकघर होतें. पलीकडे सरपणकाडी ठेवण्यास एक लहान पडवी उतरली होती. पुढच्या पडवीत एक खाट होती, त्या खाटेवर गयादिनाने आनंदाला बसावयास सांगून तो आंत गेला. तेथे त्याने आणलेलें सामान ठेविलें. नंतर तो बाहेर आनंदाजवळ खाटेवर येऊन बसला.

 "बेटा आनंदा ! तुझ्या खिशांत काय आहे ? " असें गयादिनानें विचारतांच आनंदा कावराबावरा होऊन गयादिनाकडे पाहूं लागला. मिठाई देतों म्हणून म्हाता-याने मला येथे आणून ही काय पीडा मार्गे लागली असे त्याला वाटले व तो घाबरला.

 गयादिनानें तोच प्रश्न पुनः केला. त्यावर आनंदानें कांपत कांपत व भीत भीत - " काय-कायहो ? माझ्या खिशांत कांहीं नाहीं-" असें उडवाउड- वीचें उत्तर दिले.

त्यावर ग्यादिनाने पुन्हा तोच प्रश्न केला.

<< तुझ्या खिशांत पेढे व खारका नाहींत ? "
आनंदा - ह्या आहेत.
गयादिन- - त्या कोणाच्या ?
आनंदा - माझ्या.
गयादिन-त्या तुला कोणी दिल्या ?
आनंदा - - मला त्या ह्यानें दिल्या.
गयादिन- तो हा कोण ?
आनंदा--तो देवळांत आला होता तो, त्यानें दिल्या.

 गयादिन--बाळा आनंदा ! असा एका गुन्ह्याबरोबर दुसरा गुन्हा करूं नकोस. तूं मारुतीच्या पुढचे ते जिन्नस नाहीं घेतलेस ? देवापुढे ते जिन्नस मी ठेविले. मी प्रदक्षिणेला गेलों असे पाहून तूं तेथें असलेल्या लोकांचा डोळा चुक- वून ते उचललेस. मीं तुला पाहिले. मग आतां उगीच नाकबूल कां जातोस ?