पान:चांदण्यातील गप्पा.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मारुतीचा प्रसाद

२३

अंगांत एक मोठा सदरा घाली; डोकीस गुलाबी अथवा पांढरा स्वच्छ फेटा बांधी. कपाळास त्यांच्या चालीप्रमाणे सर्व कपाळभर गंध लावून त्याला भिंव- यांपर्यंत ओरखडे ओढलेले असत. त्याची काठी बहुतकरून आडवी बगलेत मारलेली असे व तो अंगावर दुहेरी धोतर ब्राह्मणासारखे एका खांद्यावरून घेऊन दुसऱ्या हाताच्या बगलेखालून मार्गे टाकी. तो फार उंच नव्हता. अंगानें थोडा जाडच होता. त्याच्या तोंडावर देवीचे वण पुष्कळ होते. मिशा पांढऱ्या सफेत झाल्या होत्या. तोंड वाटोळें होतें. मद्रा नेहमीं शांत दिसे. त्याचा प्रामाणिकपणा त्याचे मुद्रेवरून व्यक्त होत असे. तो कुठेही व केव्हांही अक्षयों भगवन्नामाचा जप करीत असे त्याच्या हातांत एक लहानशी स्मरणी अक्षयों असे. गयादीन कोठें कोणाशीं अद्वातद्वा बोलतांना व चकाट्या पिटतांना दिसला नाहीं. तो कोणाचे घरीं फारसा जात नसे आणि कोणाचे भानगडींत पडत नसे. सकाळ संध्याकाळ देवदर्शनापुरता आपल्या झोपडीच्या बाहेर पडे.


 गयादिनानें प्रदक्षिणा घालतांना आनंदाचें हे कृत्य पाहिले. त्याला ते बरे वाटले नाही. देवाला नमस्कार करून घरीं जातेवेळीं तो आनंदाला. म्हणाला “ वेटा, मी तुला मिठाई खायला देतों चल.असें म्हणून गयादिनानें त्याचा हात धरिला व त्याला आपलेवरोबर घेऊन तो चालू लागला. लहान मुलाला मिठाईच्या नांवांतच कांहीं जादू असते. कडू औषध पिणे, कठिण काम करणें, या गोष्टी मिठाईच्या मध्यस्थीनें लहान मुलांकडून करवून घेतां येतात. हे झालें इतर मुलांबद्दल. मग आनंदा- सारख्या मुलाला त्या शब्दानें जादूसारखी भूल पडली तर त्यांत नवल ते काय ?

 भुकेच्या वेळेस गोळाभर भात मिळण्याची ज्यास पंचाईत, त्यास मिठाई कोठली ? आनंदा जादूने भारल्यासारखा गयादिनाचे बरोबर पावले टाकीत चालला. गयादिनानें पुलाच्या खालच्या अंगास असलेल्या दुकानांतून थोडी जिलबी, भजीं, बेसनाचे लाडू व दोन पेले चहा विकत घेतला, व तो आपल्या झोंपडीकडे जाऊं लागला. आनंदाला त्या जिलबीचा व भज्यांचा वास अप्रतिम् वाटला, आणि गयादिनाचे झोपडींत केव्हां जाईन व केन्हा त्यावर ताव मारीन असे त्यास झालें !