पान:चांदण्यातील गप्पा.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२
चांदण्यांतील गप्पा

आनंदा मात्र अगदी एकटा पडला. त्याची आईबापें होतीं तेव्हांही त्याला वेळच्या वेळी खाणेपिणें व ममतेचा शब्द ठाऊक नव्हता, मग आतां तर त्याला कोणीच नाहींसें झालें. तेव्हां विचाऱ्याची कोण काळजी वाहणार ? आणखी त्याला भूक लागली कीं, तहान लागली म्हणून कोण चौकशी करणार ?- किंवा त्याच्या दुखण्याबाण्याची काळजी वाहाणार ? - अथवा त्याला नीतीच्या, वोवाच्या व सद्वर्तनाच्या गोष्टी सांगणार ? तो एखाद्या जंगली झाडासारखा आपोआप वाढला. त्याला शिक्षण अथवा वळण मुळींच मिळाले नाहीं. जंगली झाड जसे पाहिजे तिकडे फुटत जाते व वाढते तशी त्याची स्थिति झाली.

 आनंदा दिवसभर इकडे तिकडे करून कसे तरी पोट भरी व रात्री आपल्या खोपटांत पडे. शेजारीं ळेंकुरवाळ्या बायका असत त्या त्याला कधीं खाऊं जेवू घालीत; पण त्या बापड्या गरीब. त्यांच्या स्वतःच्या मुलांचीच पोट भरण्याची मारामार, मग त्या त्याला दरगेज कोठून काय देणार ? हवेसाठीं जवळच्या मोठया गांवचे चांगले चांगले संभावित लोक सागांवच्या देवळाच्या आसपास येऊन झोंपड्या उभारून राहिले होते. एका संक्रांतीच्या दिवशी सकाळी सभोवतालच्या बायका बाणवसा करण्यास मारुतीच्या देवळांत जमल्या होत्या. त्यांपैकी किती एकांनीं देवापुढे नारळ फोडले; कोणी देवापुढे खारका ठेवल्या; कोणी बदामा, कोणी खडीसाखर, कोणी कांहीं, कोणी कांहीं ठेविले, ते सर्व गुरव व गुरवांचीं मुले उचलीत व मध्येच त्यांचा डोळा चुकवून कांहीं तरी पदार्थ आनंद उचलून पटकन् खिशांत टाकी. हा त्याचा नेहमींचा क्रम असल्यामुळे त्याला ती विद्या बरीच साध्य झाल्यासारखी झाली होती. डोळा चुकवून पदार्थ कसा खिशांत टाकावा या कामांत स्वारी बरेच दिवसांपासून चांगलीच प्रवीण झाली होती संक्रांत असल्यामुळे देवदर्शनास लोक पुष्कळच येत होते. त्यांत एक म्हातारा पर देशी भय्या दर्शनास येऊन त्यागें देवापुढें चारपांच केळी, एक नारळ व पेढ्यांच पुडा ठेविला. देवाचे दर्शन घेऊन, कापूर लावून तो प्रदक्षिणेस गेला. ही संधि साधून आनंदानें थोडेसे पेढे व दोन केळीं पटकन् उचलून खिशांत टाकलीं, हे त्या म्हाताऱ्याने पाहिले. त्याला तें बरें वाटले नाहीं. म्हातारा भारीच पाप- भीरु होता. त्याचे नांव गयादीन गयादीन आपल्या जातीच्या लोकांसारखा फारसा उग्र दिसत नव्हता. त्याच्या वयाला पन्नाशी उलटून गेली होती. तो