पान:चांदण्यातील गप्पा.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०
चांदण्यांतील गप्पा

 बाबासाहेबांच्या खोलींतून खालच्या दिवाणखाण्यांत मी येतों तोंच त्यांचे कारभारी परशुरामपंत यांनी मोठ्या आश्चर्यचकित मुद्रेनें मला म्हटले, ' मास्तर साहेब, आज आपणावर यजमानांची मोठी मेहेरबानी झाली बोवा !"
मी- ती कशी ?
 परशुरामपंतः- त्यांनी होऊन तुम्हांला आपल्या खोलींत वोलाविलें ! ही का लहानसहान मेहरवानी !
 मी- त्यासंबंधाने म्हणत असलां तर आहे खरी बोवा !
परशु० - स्वारी पुन्हा आपल्या पहिल्या वळणावर चाललीसें वाटतं.
 मी- पहिल्या वळणावर म्हणजे काय ? तुम्ही काय म्हणतां ते मला कांहींच कळत नाहीं.
 परशु० - म्हणजे ! (मोठ्या आश्चर्याने म्हणतो) यजमानांची पहिली बायको वारल्यावर यजमान कोणत्या थराला गेले होते साच्या मुंबईला व वांईला ठाऊक आहे; आणखी तुम्हांला त्याबद्दल कांहींच ठाऊक नाही ?
 मी - नाहीं वोवा. मला कोठून असेल माहित ? यावासाहेबांना दोन बायका झाल्या हे सुद्धां आज तुमच्याच तोंडून मला कळत आहे.

 परशु० -तर मग तुम्हांला कांहींच ठाऊक नाहीं. बाबासाहेबांची पहिली बायको वारल्यावर त्यांनी किती तरी दिवस दुसरे लग्नच केले नव्हते. आम्ही सर्वांनी पुष्कळ आग्रह केला, पण ते का आमच्यासारख्यांचें ऐकतात ? किती झाले तरी आम्ही त्यांचे आश्रितच. त्या वेळी त्यांची तिशीही उलटली नव्हती- अगदी तरुण होते. तरुण संपत्तिमान् असल्यावर भोंवतीं अनेक तऱ्हेचे लोक जम तात. तशांत यांचा पडला वकिलीचा धंदा. त्या धंद्याच्या निमित्तानेही यांच्याकडे पुष्कळ तऱ्हेच्या लोकांचें येणेजाणे होत असे. हे मुंबईत चांगल्या नामांकित वकि- लांत पहिले होते. पैशाचा जणूं त्यांच्यावर पाऊस पडत होता. एकएका महिन्याला सात सात आठ आठ हजार रुपये त्या वेळीं यांना मिळालेले मी आपल्या डोळ्यांनी पाहिले आहेत. त्या पैशांबरोवर वाईट संगतीने दारूही पण यांच्या घरात शिरली ! प्रथम कांही फारसें व्यसन नव्हते, पण पुढे पुढे दिवसांचे दिवस दारूच्या धुंदीत जात. दारूच्या व्यसनाबरोबर हलकट लोकांच्या संगतीनें दुसरेही व्यसन यांना लागले. दुसऱ्या बाईसाहेबांच्या लग्नानंतर त्यांच्या शहाणपणानें हे चांगले सुधारले होते, पण पुन्हां पूर्व वळणावर स्वारी जाऊं लागलीसें वाटतें.