पान:चांदण्यातील गप्पा.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चांदण्यांतील गप्पा

काय सामान होतें व ती कशी होती हैं ठाऊक नव्हते. खोली राहो; पण ज्याच्या आश्रयानें आपण राहात त्या आपल्या अन्नदात्या यजमानाचा पूर्व वृत्तांत काय होता, त्याच्या कुटुंबांत माणसे कोण होतीं, याचीसद्धां मला माहिती नव्हती.

 एके दिवशीं तिसरे प्रहरी मी मुलांना घेऊन गढीच्या मागें बाग होती तींत फिरावयास गेलों. मुलांच्याबरोबर एक दोन गडीमाणसें होतीं. बागेत गेल्यावर मी आपले अभ्यासाचें पुस्तक बरोबर घेऊन गेलों होतों. ते घेऊन तेथे एका अव्याच्या झाडाखालीं मी वाचीत बसलों व मुलें खेळू लागलीं; आणि गडीमाणसे गप्पा मारीत झोंपड्यांत बसली. मुले झोंपडीजवळ खेळत होतीं म्हणून मी निर्धास्त होतों, व वाचनांत अगदीं गढून गेलो होतो. तो एकदम विहिरीत कांहीं पडल्याचा मोठा आवाज झाला. तो ऐकतांच माझे काळजांत चर्र झाले व तेथून उठून मी एकदम विहिरीकडे गेलों. पाहात तो अक्का- साहेब आंत पडलेल्या ! मी लगेच अंगांतलें फेंकून दिलें, धोतराची कांस मारली, जानवें कमरे सभोंवर्ती खोंचलें, व एकदम विहिरीत उडी टाकली. मुलीनें एक गटंगळी खाऊन ती वर आली. तोच मी तिची वेणी धरून तिला वर ओढली व पोटाश घरली. वर गडीमाणसें होतीं. त्यांनी पाळणा वगैरे आणून तो आंत सोडळा. त्यांत मी तिला बसवून वरच्या लोकांनी तो सावकाश शिंकाळून घ्यावा म्हणून त्यांस बजावून मी वर चढलों व पाळणाही त्यांनी वर ओढला. मुलगी चांगली सावध होती. एखादें मांजर विहिरीत पडलेले पोहोन्यायित काढले म्हणजे तो पोहोरा जमिनीवर टेंकताच भोंवतालच्या माणसांना भिऊन ते जसे पटकन् ( उडी मारून चालतें होते, त्याप्रमाणे पाळणा भुईवर टेंकतांच अक्कासाहेब चट्कन् पाळण्याबाहेर उडी मारून आल्या. हे पाहून आम्हां सर्वोस पराकाष्ठेचा आनंद झाला, व देवानें मोठी खैर केली असे वाटलें. नाहीं तर त्या मुलीला बुडावयास वेळ तो कितीसा लागता ! आणखी तसे झालें असतें तर केवढा दुर्धर प्रसंग ! तीं दोन मुले बाबासाहेबांचा अगदीं जीव की प्राण होतीं. त्यांच्या सुखासाठी बाबासाहेव किती खर्च सोशीत होते, किती माणसें बाळगीत होते ! मुलांच्या पायाला कांटा बोंचला तर बाबासाहेबांना स्वस्थ झोप येत नसे, मग मुलीवर बुडण्याचा प्रसंग आला असता तर त्यांची काय दशा झाली असती ! असो. आम्हां सर्वोवरचा त्या दिवशीं हलगर्जी म्हणून घेण्याचा प्रसंग परमेश्वरानें टाळला एवढें खरें.