पान:चांदण्यातील गप्पा.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चांदण्यांतील गप्पा.


गोष्ट पहिली,


" शिसवी पेटी."


 फाल्गुन मास संपत आला. वसंताचों पूर्व चिन्हें दिसूं लागलीं. बहुतेक वृक्ष- वेलींनी आपल्या जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन सुंदर सुंदर रंगांची वस्त्रे परिधान केली व कांही करीत आहेत;-जणूं काय युवयुवति एखाद्या मोठया समारंभास जाण्यासाठी नटूनथटून तयार झाल्या आहेत, अथवा वसंतरूप फार थोर पाहुणा आपले घरी येणार म्हणून थाटमाट करून त्या त्याची वाटच बघत आहेत ! घरधनी व घनिती यांनी सुंदर पोषाख केल्यामुळे ती आनंदात आहेत असें पाहून आश्रितसमुदायही आनंदित दिसत आहे. पिढयान्पिढया आश्रय करून राहिलेला पक्षिगण मोठ्या गढबडीनें इकडून तिकडे तिकडून इकडे जात येत आहे. त्यांच्याही अंगावर चित्रविचित्र रंगांचे पोषाख दिसत आहेत. कोणाचा तांबडा, कोणाचा हिरवा, कोणाचा पिंवळा, कोणाचा निळा, कोणाचा पारवा, कोणाचा पांढरा शुभ्र, कोणाचा बुट्टीदार; कोणीं डोक्यावर तुरा खोवला आहे; कोणीं विडे खाऊन तोंडे लाल केली आहेत; कोणी तोंडास व पायांस हळद फांसली आहे; कोणी आपल्या पायांस मेंदी लावली आहे, याप्रमाणे ज्याने त्यानें आपआपल्या आवडीप्रमाणे आपणास शृंगारले आहे.

 सकाळी व दुपारी मंजुळ सूर काढून हा नटवा पक्षिगण गात आहे. त्या निरनिराळ्या पक्ष्यांची निरनिराळी गाणीं ऐकिलीं असतां 'आज यांनी एकमेकां- वर ताण करण्याचें मनांत आणिले आहे की काय ?? असा भास होत आहे.