पान:चांदण्यातील गप्पा.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२ )

गोविंदरावांच्या सहवासामुळे काशीताईच्या अंगी बहुश्रुतपणा आला हे मात्र खरे आहे. आपल्या वाचनांत आलेले सुंदर प्रसंग ते पत्नीस सांगितल्या- -खेरीज बहुधा राहात नसत. रवींद्रनाथांची गीतांजलि, हिबर्ट-लेक्चर्स, इत्यादिकांच्या भाषांतरांत उभयतौनीं भाग घेतला होता. काशीताई सुशिक्षित होऊन ग्रंथकर्त्री झाल्या याबद्दल गोविंदरावांना साभिमान आनंद वाटत असे; आणि तो अस्थानों होता, असे कोण म्हणेल ?

 काशीताईंचे तीन ग्रंथ महाराष्ट्रवाचकांच्या पुढे आले आहेत. 'रंगराव' त्यांचा पहिला ग्रंथ. डॉ. आनंदीबाईंचें चरित्र हा दुसरा; व चांदण्यांतील गप्पा हा तिसरा. याशिवाय काहीं निबंध व इतर लेख त्यांनी लिहिले. ते करमणूक, मनोरंजन आणि निबंधचंद्रिका, नवयुग, इत्यादि नियतकालिकांत प्रसिद्ध झाले. ‘रंगराव' ही स्त्रीने लिहिलेली पहिलीच मराठी कादंबरी आहे. या कादंबरीची थोडीशी हस्तलिखित प्रत कै. हरिभाऊ आपटे यांच्या हाती पडली होती. हरिभाऊ त्या वेळीं डेक्कन कॉलेजमध्ये शिकत होते. पुणे वैभव वृत्तपत्रांत प्रतिमासी त्यांची कादंबरी प्रसिद्ध होण्याच सुरवात झाली होती. कीर्तीच्या उदयगिरीवर चढणाऱ्या या नामांकित कादंबरीकाराने रंगरावाचीं कांहीं पृष्ठे वाचल्याबरोबर वर ज्याचा उल्लेख केला आहे ते पहिले पत्र काशीताईंना पाठविले. या वेळी काशीताईंचें नांव हरिभाऊंना ठाऊक नव्हते. हरिभाऊंनी आपल्या पहिल्या पत्राचा आरंभ 'तीर्थस्वरूप सौ. अंबुताई यांस' असा केला आहे. रंगराव कादंबरीत अंबुताई नांवाचे पात्र आहे. त्याच काशीताई होत, अशा समजुतीने त्यांनी काशी- ताईंना ' अंबुताई ' या नांवाने संबोधिलें होतें. पुढील सर्व पत्रांत त्यांनी 'ती. सौ. काशीताई, अशी दुरुस्ती केली आहे. वरील सालापासून हरिभाऊ व काशीताई यांचा पत्रव्यवहार सुरू झाला. यांत अनेक बाङ्मयात्मक गोष्टींचा व सुप्रसिद्ध व्यक्तींचा उल्लेख आहे. हरिभाऊ 'रंगराव' कादंबरीचा भाग वाचून फार खूष झाले. त्यांनी ग्रंथकर्त्रीला जे अभिनंदनपर पत्र पाठविले, त्यांतला थोडासा उतारा पुढे देतो. “ आपली कादंबरी वाचून मला आपल्यास प्रख्यात इंग्रजी कादंबरी लिहिणाऱ्या ज्या मिस् जेन ऑस्टेन बाई, किंवा फ्रेंच कादंबऱ्या लिहिणाऱ्या जॉर्ज साँवाई, यांच्या जोडीला बसवावें असें