पान:चांदण्यातील गप्पा.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लावण्यवती

९७

मी या स्थितीत आहे, आणि हीच सर्वोत उत्तम अशी स्थिति आहे. स्वप्नांतल्या राज्यप्राप्तीबद्दल कोणी गर्व केला आहे, अथवा कोणाला हर्ष झाला आहे काय ?" त्या गुरुशिष्यांचे याप्रमाणे कांहीं भाषण होत आहे तो त्या मठीजवळ येऊन पचल्या. मठींत कमंडलु ठेवून आसन मांडून ध्यानधारणादिकानें मग्न झाल्या. त्या ध्यानस्त आहेत तों आपण स्वरूपसिंहाकडे वळू.

 स्त्ररूपसिंह लावण्यवतीला विचारून जो मृगयेला म्हणून गेला, तो एका राज धानीस गेला. तेथे बरीच खटपट करून त्यानें एक बहुमानाची जागा मिळविली. तेथें त्यानें लावण्यवतीच्या वैभवास शोभेल असा सर्व थाटमाट, इतमाम वगैरेची तजवीज केली. वाढाही खरेदी केला. आतां तिला आणून तिच्याशी लग्न करून दांपत्यसुखाचा अनुभव घ्यावा, म्हणून तो आपल्या लवाजम्यासह लावण्य वतीला ज्या अरण्यांत सोडली होती तेथें आला. या गोष्टीला बरेच दिवस लागले. मध्यंतरी त्याच्या अनेकवार मनात येई की, आपण एकदां जाऊन तिला आणावी आणि मग बाकीच्या खटपटी कराव्या. रानांत दोघीच स्त्रियांना सोडून आपण तीन दिवसांनी येतो. म्हणून सांगून आलों, तेव्हां त्यांची वाट तरी काय झाली असेल, ही काळजी त्याला रात्रंदिवस लागली होती. परंतु जाण्यायेण्याचा पल्ला लांब शिवाय दरबारांत खटपट करून ती साध्य होण्यास बरेच दिवस लागले. शिवाय दरबारची स्थिति चमत्कारीक व राजेलोकांचेही स्वभाव चमत्कारीक असतात, या कारणानेही थोडा उशीर लागला. त्यांची वचनें कितीदां तरी भंग पावतात ! कितीदां ते संपत्ति दान करितात व कितीदां त्यांचे हातांत झोळी देतात. अशा स्थितीत काम अर्धवट टाकूनही त्याला जाववेना. दुसन्या कोणाला पाठवावे किंवा सेवक पाठवून तिला आणावी तर ती त्यांच्यावरोवर येईल की नाहीं याबद्दल त्याला खात्री वाटेना. माणूस पाठवला तरी नवीन ठिकाणी एवढ्या विश्वासाचा माणूस त्याचे जवळ कोठून असणार ! अशा सर्व अडचणींमुळे त्यानें परमेश्वरावर हवाला ठेवून संधि येतांच लावण्यवतीला आणण्याचा वेत कायम करून दिवस काढले.

 अनुकूल काळ येताच मोठ्या वैभवाने व तिच्या बापाच्या वेळेसारखा मान- मरातब राहील अशा थाटानें पालखी, मेणा, घोडेस्वार, दासदासी इत्यादि सर्व इतमाम बरोबर घेऊन तो त्या अरण्यांत आला.