पान:चांदण्यातील गप्पा.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लावण्यवती

८९

कारण झालें ?’ असे विचारावें. पण पुन्हा तिला वाटलें, असें साधु मोठे विलक्षण असतात. ते आपली मूळ गोष्ट सांगणार नाहींत. उलट रागावतील मात्र; तेव्हां त्या भानगडीत पडावें कशाला !

 याप्रमाणे त्यांची भेट झाली. पण दोन स्वभाव अगदी विरुद्ध असल्यामुळ कांहीं फारसे वोलणेंचालणे न होतां लावण्यवती कांहीं वेळ तेथे बसल्यावर तेथून उठून नदीतीरीं हिंडावयास गेली.

 स्वरूपसिंह गेल्यापासून दोन तीन दिवस कसेतरी तिनें त्या अरण्यांत घालविले. जातांना त्यानें तीन दिवसांनी परत येतों म्हणून सांगितलें होतें. त्याचप्रमाणे तीन दिवस होऊन गेले, तरी त्याचा ठिकाण नाहीं. चवथ्या दिवशी तरी येईल असे तिला वाटलें. तोही दिवस गेला. याप्रमाणे आठवडा, पंधरावडा, एक महिना, दीड महिना होऊन गेला, तरी स्वरूपसिंहाचा पत्ता नाहीं. या दोघी बायका निर्जन अरण्यांत पडलेल्या. जवळ पोटापाण्याची सामुग्री नाहीं. कांहीं मोलवान जवाहीर लपवून ठेवलेले होते, त्याच्या सुरक्षततेची सारखी काळजी. कारण वोलून चालून अरण्यच तें तेथें चोरचिलटांच्या भितीला काय विचारावे ?

 शिवाय स्वरूपसिंह शिकारीस एकटाच गेलेला. तेव्हां त्याच्या जिवास कांहीं अपाय झाला की काय, ही तिला फार काळजी लागली. ती वेड्यासारखी आस- पासचीं राने हिंडून येई. रात्रीं खोपटाच्या बाहेर वाळलेल्या पाचोळ्यांतून कांही प्राणी चालल्यामुळे थोडी खजवज झाली की, तिला तिचा प्रियकर आल्याच भास होई. घोड्यानें वैरणीकरितां पाय आपटला तरी आपल्या जीवाचा जीव आला असे तिला वाटे. तिचा बाप मेला तेव्हां स्वरूपसिंहाचा तिला मोठा आधार वाटत होता. तोही आज नाहींसा झाला. मोगरी ती काय बोलून चालून म्हातारीच. तिची सोबत ती कसची ? ती म्हणाली- 'स्वरूपसिंहाच्या जिवावर राजधानी, आई, भाऊ, आपल्या राज्याचा हिस्सा, या सर्वांवर लाथ मारून मी बाहेर पडलें, आणि त्या स्वरूपसिंहाने मला अशा या निर्जन अरण्यांत आणून टाकून आपण निघून गेला! त्यालाही भावांप्रमाणेच माझा कंटाळा आला काय ? देवा ! असा हा अभागी प्राणी जन्मास तरी कशाला घातलास ? जन्मतांच आईनें सोडले; उपवर होतांच बापाने सोडले; व आतां तारुण्यांत