पान:गोमंतक परिचय.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण दुसरे. व त्यासाठी गोमंतकाचें त्रिकोणमापन करून गांवानिहाय थिओडोलाइटने लहान लहान बहूकोण ( Poligonos) पाडून त्यांतून टेबल मोजणीच्या द्वारे सर्व्ह नंबराचा नकाशा काढण्यात येतो. आजवर फोंडे, तिसवाडी, सांखळी, वगैरे कोंसेल्यांची मोजणी झाली असून इतरत्र चालू आहे. तसेच शेतीसाठी नवी जमीन लागवडीस देण्याचे काम याच खात्याकडे असते. खात्याचे डायरेक्टर सिव्हिल इंजिनियर असावे लागतात. शेतकी खातें तर रिपब्लिकच्या स्थापनेनंतर सुरू झाले असून त्यांतून बऱ्याच ठिकाणी प्रयोग चालत आहेत. नवीन खतें व औतें यांचा प्रसार अद्याप ह्या खात्यांतून म्हणण्याजोगा झालेला नाही. शेतकीचे प्रयोग बरीच वर्षे करून पाहिल्यानंतरच त्यांची उपयुक्तता लोकांस पटत असते. त्यामुळे तूर्त तरी ह्या खात्याविषयी सर्वत्र ओरडच आहे. परंतु आपल्या हाती असलेल्या फॉरेस्ट खात्यांत, सागाची, रबराची वगैरे लागवड ह्या खात्याने चालविली आहे व तींत बरेंच यश मिळविले असल्याचे रिपोर्टावरून दिसून येते. खात्याचे डायरेक्टर शेतकी इंजिनियर असून तूर्त त्यांत आणखी तीन इंजिनियर, एक पशुवैद्य व ४ बी. एजी. काम करतात. म्युनिसिपालिट्याः-पोर्तुगीज अमलापूर्वी म्युनिसिपालिट्यांचे कामही कोमुनदादींच्याच हातून होत होते. ही संस्था हिंदुस्थानांत प्रथम पोर्तुगीजांनीच आणली. सुरुवातीला पणजीची म्युनिसिपालिटी (पूर्व काळांत गोवें शहरांत आल्बुकर्कनें स्थापन केलेली सेनाद द गोअ) स्थापन झाली. नंतर क्रमाक्रमाने इतर कोंसेल्यांतही म्युनिसिपालिट्या स्थापन झाल्या. गोमंतकांतील म्युनिसिपालिट्यांची रचना कांहींशी लोकल बोर्डाच्या धर्तीची आहे. इ. स. १९१९ पर्यंत जुन्या काबिजादींतल्या तीनच म्युनिसिपालिट्या केवळ लोकनियुक्त अशा होत्या; व बाकीच्या कोंसेल्यांत दोन सरकारनियुक्त सभासद व आदमिनिस्वादोर अशा तीन मेंबरांची म्युनिसिपल कमिटीच काम करी. त्यांचा अध्यक्ष आदमिनिस्वादोर होता. प्रांतिक स्वायत्ततेच्या हक्कांबरोबरच साऱ्या म्युनिसिपालिट्या लोकनियुक्त बनल्या. खालील कोष्टकावरून त्यांची रचना व जमाखर्च यांची माहिती मिळेल.