पान:गोमंतक परिचय.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय विजयनगरची सत्ताः- इ. स. १३६७ त, म्हणजे मुसलमानांच्या प्रवेशानंतर फक्त ५३ वर्षांनींच, हरिहरराय विजयनगरच्या गादीवर बसला व त्याने यति माधवाचार्य याला गोमंतकावर स्वारी करायला पाठवून मुसलमानांनां हांकून लाविलें, सप्तकोटीश्वराची पुनः स्थापना केली व जुन्या गोव्यांतील गोमांचल तीर्थाचा जीर्णोद्धार करून त्याला माधवतीर्थ हे नांव देऊन, तेथील भूमि ब्राह्मणांस दान दिली. त्यामुळे त्या जागेला ब्रह्मपुरी हे नांव मिळाले. याप्रमाणे मुसलमानांची पहिली राजवटी गोमंतकांतून नष्ट झाली. पुढे १४०६ त एका दैवज्ञ ब्राह्मणकन्येमुळे बहामनी फिरोजशहा याचें कृष्णरायाशी युद्ध झाले व त्यांत विजयनगरच्या राजाचा पराभव होऊन तहांत आपली मुलगी फिरोजशहाला द्यावी लागून वर ४० लक्ष रुपये, पांच मण मोती, पन्नास हत्ती व बांकीपूर परगणा इतकी संपत्ती गमावणे भाग झाले. त्या अपमानानें कृष्णराय, रामाचे भूशीर येथे ६ महिने एकांतवासांत राहिला होता. विजयनगरच्या राजांची सत्ता गोमंतकावर इ. स. १४६८ पर्यंत म्हणजे १०१ वर्षे राहिली. मुसलमानांचा दुसरा प्रवेशः–इ. स. १४६९ त वाजंत्र्यांना सांगितलेली देणगी विजयनगरच्या राजाने दिली नाही या क्षुल्लक सबबीवर महमदशहा बहामनी याच्या महमद गवान नांवाच्या सरदाराने गोवा प्रांतावर हल्ला करून तो काबिज केला. गोव्यांत त्या वेळी अमराजी नांवाचा विजयनगरचा प्रतिनिधी कारभार करीत होता. महमदशहाने या विजयाप्रीत्यर्थ बेदर येथें सात दिवस उत्सव केला व जातीने गोव्यांत येऊन खुष करून या शूर सरदाराला किस्वरखान असा किताब देऊन सुभेदार नेमले. इ. स. १४७९ सालीं होनावरच्या मालिक हासीम नांवाच्या सरदारास तेथील हिंदु राजाने भंडावून सोडले तेव्हां तो गोमंतकांत येऊन बहामनी राजाच्या आश्रयास राहिला. त्याने आपणासाठी जे शहर वसविलें तेंच जुनें गोवें होय. तेथेंच मग मुसलमानांनी राजधानी केली. अमराजीने मसलमानांना स्वस्थता दिली नाही. त्याने बेळगांवच्या विक्रमराय नांवाच्या राजाला गोव्यांवर हल्ला करण्यास प्रवृत्त केले. परंतु तो गोमंतकांत येतो न येतो इतक्यांतच महमदशहाने बेळगांवचाच किल्ला सर करून उलट त्यालाच संकटांत घालून हा बेत फसविला. किस्वरखानाच्या मागे फकीर उल्मुल्ख याला गोव्याची सुभेदारी मिळाली. ह्याच्या कारकीर्दीत १४८१ साली अमराजीने मोठे सैन्य घेऊन गोव्यावर स्वारी केली. तेव्हां महमदशहाने युसफ आदिलशहाच्या हाताखाली मोठी फौज देऊन अमराजीला घालवून दिले. पुढे इ. स. १४८६ त बहादुर