पान:गोमंतक परिचय.pdf/218

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय पाहणी करावयाची असल्यामुळे बऱ्याच प्रयत्नाने एकंदर शाळांची संख्या व स्थळे अगाऊच मिळविली होती. पण प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे हा प्रयत्न तितक्यावरच राहिला. । परंतु ह्या मिळविलेल्या माहितीवरून गोव्यांत सुमारे १७८ शाळा केवळ हिंदुजनतेच्या प्रयत्नाने चालत होत्या असें त्याला दिसून आले होते. वास्तविक पाहिल्यास, या शाळांना स्थैर्य असें मुळीच नाही. कारण गांवांतील एकाद्या गृहस्थाच्या आश्रयाखाली किंवा चार दोन होतकरू तरुणांच्या प्रयत्नाने या शाळांची उत्पत्ति होत असते. अर्थात् उत्साहाचा हा पहिला वेग ओसरतांच शाळा थंडावतात. असे जरी असले तरी लोकांत शिक्षणाभिरुचि इतकी वाढली आहे की, कोणाच्याही प्रयत्नाने का होईना पण एकदा गावांत चार दोन वर्षे शाळा चालली, म्हणजे ती बंद पडल्याचे उदाहरण सहसा दिसून येत नाही. अधिकारी मंडळ, शिक्षक किंवा शाळेची जागा, यांत मात्र वारंवार फेरबदल होतात. गोमंतकीय शाळांपैकीं स्थैर्य मिळालेल्या अशा शाळा बऱ्याच कमी आहेत आणि व्यवस्थेशीर नियमबंदी व इतर कानु तयार होऊन ज्यांचा कारभार चालतो अशा शाळा त्याहीपेक्षा थोड्या आहेत. मात्र या थोड्याच शाळांतील शिक्षणकार्य इतकें उच्च दर्जाचे असते, की त्याला महाराष्ट्राच्या इतर भागांत देखील मोठ्या मुष्कीलीनेच जोड मिळेल. ब्रिटिश शिक्षण खात्यांतील बऱ्याच एज्युकेशनल इन्स्पेक्टरनी या शाळांची परिक्षा घेतली असून त्यांनीही अशाच सारखे शेरे दिले आहेत. इ. स. १८२५ साली मिळविलेली माहिती पुढील कोष्टकांत संकलीत केली आहे. माहिती न मिळालेल्या ७५ शाळांतील मुलांचे प्रमाण, शिक्षक व त्यांचा पगार, इत्यादि बाबी इतर शाळांच्या सरासरीवरून काढल्या तर या शाळांत आणखी ३४०० मुलें शिकत असून सुमारे सतराशे रुपये पगारादाखल आणखी जमेस धरावे लागतात. आणि हे आंकडे वरील कोष्टकांत मिळविले म्हणजे गोमंतकांतील २,१८,२२३ हिंदुलोक आपल्या मुलांना मराठी शिकविण्यासाठी, दरसाल सुमारे ४८ हजार रुपये खर्च करतात. प्रत्येक हिन्दू साडेतीन आणे कर आपखुषीनेच मराठी प्रीत्यर्थ भरतो असा त्याचा अर्थ झाला. दुसऱ्या रीतीने पाहिल्यास हा खर्च ८०८४ मुलांप्रीत्यर्थ होतो. म्हणजे शाळेत जाणारा प्रत्येक विद्यार्थी दरमहा आठ आणे फी देतो असेच म्हणावें लागते. मराठी भाषेसाठी गोमांतकीय हिंदूंनी कोणता स्वार्थत्याग केला आहे अशा प्रश्नास हे उत्तर पुरेसे नसल्यास, पुढे वाङ्मयविषयक प्रयत्न इत्यादि वर्णनांत ते मिळेलच. तत आपण काही प्रमुख प्रमुख विद्यालयांची भेट घेऊ. या शाळांची माहिती देतांना एक गोष्ट अवश्य लक्ष्यात घेतली पाहिजे, की या बहुतेक शाळा रिपब्लिकच्या स्थापनेनंतरच उत्पन्न झाल्या आहेत.