पान:गोमंतक परिचय.pdf/214

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय ७८ ‘णाचा वर्ग हाच होता. आणि तो इतका कार्यक्षम होता की, काळाच्या कराल दाढेतून चुकलेला त्यांतला एकादा मुरब्बी अद्याप जर कोठेही सांपडला तर त्याचे मराठी भाषेचें छंदःशास्त्र, अलंकार इत्यादीचे ज्ञान ऐच्छिक मराठी घेतलेल्या कोणत्याही आधुनिक एम. ए. पंडिताला चार धडे देण्याइतके खात्रीने असेल. या वर्गाचा दुसरा फायदा म्हणजे, मुलांना त्यांतून अनायासेंच भारतीय संस्कृतीचे ज्ञान होई. महाभारत व रामायण यांतील महत्वाचे प्रसंग तर सोडाच, पण बारीक सारीक कथा व विशेष महत्वाचे वादविवाद माहित नसलेले तरुण त्या काळी विरळाच होते. - पहिल्याच आधुनिक मराठी शाळाः-या विषयींची माहिती तत्कालीन वृत्तपत्रांच्या फायलींच्या अभावामुळे, जुन्या माहितगार गृहस्थांकडून मिळविलेली तेवढीच देत आहो. म्हापशें येथे नूतन पद्धतीने मराठी शिक्षण देणारी शाळा इ. स. १८९० च्या सुमारास श्री. रामचंद्र दत्तात्रेय कुळकर्णी ऊर्फ रामभाऊ आजरेकर यांनी स्थापन केली होती. व तिच्या खाली बारदेश प्रांतांत बऱ्याच शाळा स्वतःच्या देखरेखीखाली चालविल्या होत्या. गोवापंच या साप्ताहिकांतही रामभाऊंचे अंग बरेच होतें. गोमंतकांतील मराठी शिक्षणाच्या अभिवृद्ध्यर्थ यांनी काही रक्कम आपल्या दोन शिष्यांच्या नांवे ट्रस्ट करून ठेविली होती, पण पुढे तिचे काय झाले व कोणाच्या उदरांत ती गडप झाली, याची माहिती प्रस्तुत लेखकास नाही. मडगांव येथे श्री. अनंत रामकृष्ण रेडकर यांनी शाळा घातली होती. शाळेतील भूगोलशिक्षणाची उणीव भरून काढण्यासाठी त्यांनी गोमंतकाचा भूगोलही पण तयार केला होता. हाच गोमंतकाचा पहिला भूगोल होय. त्यांच्याच वेळी श्री. तात्याजी सीताराम पाटकर यांनीही शाळा उघडली होती व गोमंतकाचा मराठीत नकाशा श्री. पाटकर यांनीच छापून आणविला होता. आरंभापासूनच या शाळांमधून मुलांमुलींना एकत्र शिक्षण मिळत असे. शणैमा. मांच्या काळी मात्र मुली फारशा शाळेत जात नव्हत्या. तथापि घरांतून रात्री जी पोथी वाचण्यांत येत असे, तिच्या श्रवणाने स्त्रीवर्गाला मराठींचे ज्ञान होई. त्याचप्रमाणे पुष्कळशा पांढरपेशा घरण्यांतून मुलींनां बापाकडून किंवा भावंडांकडून लिहिण्यावाचण्यापुरतें ज्ञान मिळे. -अशी ही स्थिति इ. स. १९०० पर्यंत होती. तोपर्यंत सारस्वत ब्राह्मण ज्ञातींतील सर्व पुरुष वर्ग व काही स्त्रिया, वैश्य वर्गातील पुरुष, मराठा समाजापैकी बरीच मंडळी व गायक समाजांतील काही लोक, इतक्यानाच कायतें शिक्षण मिळत असे. त्यानंतर