पान:गोमंतक परिचय.pdf/206

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय ७० । रिपब्लिकच्या स्थापनेनंतर इ. स. १९१८ साली पणजी येथे इंस्तितूत कोमेसि, याल नांवाची व्यापारी शिक्षणाची शाळा स्थापन झाली. इंग्रजी भाषा, फ्रेंच भाषापोर्तुगीज भाषा, बुककीपिंग, व्यापारी भूगोल व व्यापाराची सामान्य माहिती, व्यापारी कायदे व राज्य व्यवस्थेचे ज्ञान, इतके विषय तींत शिकविण्यांत येत. पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारच्या निरनिराळ्या खात्यांतून जागा मिळण्याचे आमिष होतें तोवरच या शाळेत विद्यार्थ्यांची भरती आली होती. आणि त्यानंतर त्या शाळेला उतरती कळा लागून शेवटी ती १९२८ मध्ये बंद झाली. या सिंहावलोकनाने पाहिल्यास, व्यापारधंदा किंवा कलाकौशल्य या बाबतींत पोर्तुगीज सरकारचे प्रयत्न, निदान गोव्यांत तरी, वांझोटेच झाले असेंच हा इतिहास सांगतो. पोर्तुगीज राष्ट्राच्या जन्मस्वभावाकडे लक्ष्य दिल्यास यांत मुळीच नवल वाटत नाही. कारण पोर्तुगाल हे व्यापारी राष्ट्रच नव्हे. कारखाने किंवा उत्पादक कला या मुळच्या तेथेच नाहीत. मग विहिरीत नसलेले पोहोऱ्यांत कोठून येणार. वैद्यक पाठशाळा:-युरोपाबाहेर स्थापन झालेल्या एकंदर पाश्चात्य वैद्यक पाठशाळांत पणजीची वैद्यक पाठशाळाच वयाने वडील आहे. आणि कर्तबगारीनही तिची योग्यता बरीच उच्च ठरते. थेट सतराव्या शतकापर्यंत तिचा उगम शोधावा लागतो. इ. स. १६९१ साली पोर्तुगालहून एक वैद्य व एक शस्त्रवैद्य असे दोन डाक्टर आले होते. व त्यांना इतर कामाबरोबर विद्यार्थी तयार करण्याचे कर्तव्यही नेमून देण्यात आले होते. नंतर १७७९ त गोवा सरकारने पोर्तुगाल सरकारकडे वैद्यांची मागणी केली असतां, " तेथील प्रवीण वैद्यांकडूनच काम भागण्यासारखे असतां वैद्यकशाळेसाठी इकडची ( पोर्तुगालची ) भारी पगाराची माणसे मागणे योग्य नव्हे " असा जबाब गोवा सरकारला आला होता. अर्थात् त्या सुमारास इकडे पाश्चात्य वैद्यकप्रवीण असे डाक्टर होते असे दिसून येते. परंतु वैद्यक शिक्षणाला व्यवस्थितपणे सुरुवात झाली ती इ. स. १८०१ साली झाली. अभ्यासक्रम सारा तीन वर्षांचाच होता. यावेळच्या शिक्षकांत भावी हिंदी गव्हर्नर बर्नार्दु पॅरिश द सील्व्ह हे देखील होते. इ. स. १८२१ त अभ्यासक्रमांत थोडीसी सुधारणा होऊन त्याची मुदतही चार वर्षांची झाली. हा सारा उपक्रम वैद्यक पाठशाळा या नात्याने चालत नसून डाक्टरवर्गाची प्रजेला जी वाढती गरज भासत होती, तिच्यामुळे ही तात्पुरती केलेली योजना होती. आणि इतर कर्तव्ये सांभाळून सरकारी डाक्टर या विद्यार्थ्यांना शिकवित होते...