पान:गोमंतक परिचय.pdf/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ६ वें. 'विषयी पुढील उद्गार काढले आहेतः “ बुद्धि प्रगल्भ होऊ न देतां शिक्षणाचा मगदूर कोठवर नेणे शक्य आहे याचा त्यांनी पक्काच शोध लाविला होता" : " त्यांच्या शिक्षणांत राम नव्हता. स्थिर अशा ठशांतून अश्मीभूत होऊन तें थंडावले होते. उच्च शिक्षणाच्या शाखा ( Faculdades ) व विद्वन्मंडळे त्यांच्या संस्थांतून भरपूर होती. परंतु त्यांची विश्वविद्यालये, बुद्धि जागरूक ठेवून ज्ञानप्राप्तीविषयी उत्सुकता उत्पन्न करणारी ज्ञानमंदिरे नव्हती. ते जें शिकवीत ते उत्तम प्रकारे शिकवीत. परंतु शिकवितांना विद्यार्थ्यांची विवेचकशक्ति थंडावल्याचे गृहित धरूनच मग शिकवीत." असें सिन्योर मिनेझिझ् बागांस यांचे मत आहे. परंतु याच कालखंडांत पोर्तुगाल देशांत मोठमोठे पंडीत निपजले होते. व त्यांनी पुनरुज्जीवनाला ( Renacenca) पुष्कळच मदत केली होती. पारिसच्या सोर्बोन युनिव्हर्सिटीतूनही पोर्तुगीज शिक्षकांची त्यावेळी वाखाणणी होत होती. इतकेच नव्हे, तर बरेच पोर्तुगीज त्या युनिव्हर्सिटीत शिक्षकाचे कार्यही करीत होते, असे इतिहास सांगतो. १८३५ पर्यंत गोव्यांतील प्रमुख प्रमुख शिक्षणसंस्था ज्यांच्या ताब्यात होत्या, त्यांचे शब्दचित्र हे असें आहे, अर्थात्च इंग्रजी विद्येप्रमाणे पोर्तुगीज विद्या हिंदुस्थानांत वाघिणीचे दूध बनूं शकली नसल्यास त्यांत नवल नाही. ही झाली एकतंत्री अमलांतील गोष्ट. परंतु आज तरी काय आहे ! पण जे काय आहे त्याचे वर्णन पुढे लिसेवची माहिती देतांना येईलच. त्याच्यापूर्वी आपण जेसुइटांच्या हकालपट्टीनंतरच्या परिस्थितीचे सिंहावलोकन करूं. - तीन सेमिनारीः-जेसुइटांना हुसकून लावतांच त्यांची कॉलेजें बंद झाली व चोडण बेट (चूडामणि) व रायतूर येथे दोन सेमिनायु स्थापन करण्यांत येऊन त्यांची व्यवस्था सां फिलिप नॅरीच्या काँग्रोगेसांवाच्या ताब्यात देण्यात आली. रायतुरची सेमिनार्य सरकारने इ. स. १७७४ साली बंद केली. इ. स. १७७९ त पोर्तुगाल सरकारने व्हिंसेतीन्यु काँग्रेगासांवाचे पाद्री गोव्यांत पाठविले व त्यांच्या ताब्यांत कोणती तरी एक सेमिनार्य देण्याचा हुकूम गोवा सरकारला दिला. त्याप्रमाणे चोडणची जी एकच सेमिनायु अजून चालू होती, तीच त्यांच्याकडे संपविण्यांत आली. तिला त्यावेळी ३७२२ असपर्त्यांचे उत्पन्न होते. अर्थात् ते अपुरे पडल्याने, ९०३८ असर्फी करण्यांत आले. परंतु शैक्षणिक करांतून स्वतंत्रपणेच सरकार शाळा चालवित असल्यामुळे, हा जादा खर्च अनवश्यक वाटून ज्युत जराल द फाद या जमावंदी कमिटीने हा वाढावा करण्याचें नाकारले.