पान:गोमंतक परिचय.pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ५ वे हिंदुसमाजास धोक्याची सूचना:- प्रस्तुत पुस्तक जसें गोमंतकीयेतरांना तसेंच गोमंतकीयांनांहि उपयोगी व्हावे या दृष्टीने लेखकाचा प्रयत्न आहे. त्यांत आर्थिक बाबाचा विचार करतांना वाचकांनी पाहिलेच असेल की, गोमंतकाचे भवितव्य बहुतांशी आमच्या परदेशगमन करणाऱ्या बंधूंच्याच हाती आजवर आहे व पुढेहि त्यांत बदल होण्याचे साधन तूर्त तरी उपलब्ध नाही.. गोमंतकांतील सुपीक जमीन तर सगळी वहिवाटीस आलेलीच आहे. जी कांहीं थोडीबहुत पडीत आहे तिच्यांत वसाहत करावयाला आज तरी अनेक अडचणी आहेत. उद्योगधंद्याची वाढ करावयाला गोमंतकांत वाव आहे खरा; पण गोमंतकाच्या आकुंचितपणामुळे, संरक्षक जकाती असतांहि, बाहेरच्या जगड्व्याळ कारखान्यांतून निघणाऱ्या स्वस्त मालासमोर टिकाव धरण्याजोगी उत्पादन शक्ति या कारखान्यांतून दिसणे शक्य नाही. तेव्हां केवळ परदेशगमन करूनच आम्हां गोमंतकीयांना आपला बचाव करणे तेवढे राहिले. त्यांत आज तरी अशी स्थिति आहे की, परदेशगमन करणाऱ्यांत, ख्रिस्ती समाजाचाच वरचा नंबर लागत असल्याने, नवीन काबिजादींतील बऱ्याच जमिनी देखील त्या समाजाच्या हाती गेल्या आहेत व प्रत्यहीं जात आहेत. ज्या कोणाला याचा पडताळा पाहावयाचा असेल त्याने न्याय खात्यामार्फत पुकारण्यांत येणाऱ्या जाहिरातीच वाचल्या तरी त्यांत तो मिळेल. अशा जाहिरातींतून धनको नेहमी ख्रिस्ती असून ऋणकोची भूमिका हिंदूंसाठी राखली गेलेली आज सुमारे १५।२० वर्षे तरी दिसेल. ही परिस्थिति हिंदु समाजाने लक्षात न घेतल्यास, आणखी थोड्याच काळांत त्याची स्थिति आजच्यापेक्षांहि बिकट होऊन, त्याला आपल्या हक्काच्या घरांतच भाडेकरी व हक्काच्या जमिनींत उपरी कूळ म्हणून काळ कंठावा लागेल. त्यासाठी हिंदूंनी आपले प्रयत्न एकवटून, सरकारी नोकऱ्या, व्यापारधंद्यांतील जागा तर शक्य तेवढया जास्त मिळविल्या पाहिजेतच; पण त्याशिवाय ज्या मार्गाने आजचा ख्रिस्ती समाज आपली संपन्नावस्था टिकवून धरून वर नव्या काबिजादीचे आक्रमण करू शकतो, तोच परदेशगमनाचा मार्ग हिंदुसमाजानें पकडला पाहिजे. नाही तर त्याची धडगत नाही.