पान:गोमंतक परिचय.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय गोमंतकीय हिंदु समाजांत मध्यम वर्गाचेच प्राबल्य असल्यामुळे असो किंवा ब्राह्मण व ब्राह्मणेतर जातींतील पुढाऱ्यांच्या समंजसपणामुळे असो, पण तीव्रतर सामाजिक विरोध किंवा ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद इकडे तेवढे बद्धमूल होऊ शकत नाहीत. कांहीं कांही वेळां सार्वजनिक चळवळींत हा वाद डोकावू पाहूं लागतो खरा, परंतु उभयपक्षीय समंजस पुढाऱ्यांच्या थोड्याशा प्रयत्नाने ह्या ठिणग्या, आगीचे स्वरूप प्राप्त होण्यापूर्वीच नाहीशा होतात, इतकेच नव्हे तर अशी कोणतीहि सामाजिक चळवळ उपस्थित झाली-मग ती वैश्यवर्गातील असो, सराठा वर्गातील असो किंवा इतर कोणत्याहि वर्गातील असो, फार काय, पण वेळी अवेळी महाजन मंडळीवर रुसणाऱ्या गायक समाजांतील असो, एकंदर समाजांतून, त्या चळवळीला जोराचा पाठिंबा मिळाला नाही असें आजवर झाले नाही. गेल्या दोनतीन वर्षांतन गोव्यांत भरलेल्या, वैश्य परिषद्, देवज्ञ ब्राह्मण परिषद्, भंडारी शिक्षण परिषद्, मराठा गायक समाजाची परिषद, इत्यादि परिषदांतून किंवा निरनिराळ्या वर्गाकडून दरसाल ठिकठिकाणी साजऱ्या करण्यात येत असलेल्या व्याख्यानमालांतून जरी पाहिले, तरी हेच दृश्य दिसून येते. जातिभेदाच्या तत्त्वावर उभारलेली द्वेषात्मक चळवळ इकडे फारशी तग धरूं शकतच नाही म्हटले तरी चालेल. कारण गोव्याचे एकंदर वातावरणच असें आहे की, त्यांत अशा चळवळी फार. तर एखाद दुसरे वर्षच टिकतात. त्यापुढे हे जंतु ह्या वातावरणांत सजीव राहू शकतच नाहीत. कांहीतरी देवाण घेवाण होऊन प्रकरणाचा निकाल लागतो. एखाद्या वर्गाच्या प्रत्यक्ष हितसंबंधावरच जेव्हां आघात होतो, त्याच वेळी ह्या चळवळी जरा जोराच्या चालतात. पण त्या बद्धमूल मात्र होऊ शकत नाहीत. आणि तसेंच पाहिले तर हितसंबंधाचा प्रश्न आल्यावर, खास ब्राह्मण वर्गातच तरी तट पडल्याशिवाय कोठे राहातात ? तेंच स्वरूप या चळवळींनाहि असते. मडगांव, पणजी, म्हापशे वगैरे ठिकाणी जातीच्या तत्त्वावर चालविलेल्या बऱ्याच । संस्था आहेत; परंतु त्या संस्थांतून संस्थापक कोणी व्हावे, (म्हणजे पैसे कोणी द्यावे ) किंवा कारभार कोणी करोवा याच मुद्यावर जातींचे तत्त्व शिरतें; संस्थेचा फायदा कोणी घ्यावा, या मुद्यावर जातीचे तत्त्व अमलांत येत नाही. कारण बहुतेक वाङ्मयात्मक, शैक्षणिक किंवा सामाजिक संस्था सार्वजनिक व मोफत उपयोगाच्याच आहेत.