पान:गोमंतक परिचय.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय १०२ ख्रिस्त्यांनी व्यापारी आगबोटीवर नोकऱ्या मिळविल्या आहेत. त्यांतल्या त्यांत पी. एंड ओ. कंपनी व बी. एस. एन. कंपनी, यांतून त्यांची संख्या बरीच महत्वाची आहे. शिंप्यांचा धंदा तर त्यांच्यांत इतका पूर्णावस्थेस पोंचलेला आहे की, मुंबईत किंवा इतर ठिकाणी टेलरिंग कॉलेजें निघालीं, लंडन डिप्लोमा मिळविलेले टेलर्स असले, तरी गोमंतकीय 'फ्रान्सिस 'चे किंवा 'कैतान 'चें गिन्हाइक उत्तरोत्तर वाढलेलेंच दिसतें. बूटमेकरचा धंदाही तसाच त्यांच्या हाती आहे. युरोपियन मालाशी स्पर्धा करण्याइतका सुबक व टिकावू माल गोमंतकीय ख्रिस्ती तयार करतात. स्वदेशी जातांना प्रत्येक युरोपियन गोमंतकांत तयार झालेले बूट, संख्याबद्ध घेऊन जात असतो. इतका हा माल सुबक असून युरोपच्या मानाने सस्ता असतो. अलीकडे चार पांच वर्षांत, रबरी स्लीपरच्या आयातीमुळे हा त्यांचा धंदा बसत चालला आहे. शिवाय काही महाराष्ट्रीय "हाराळे” मोचीही त्यांच्याचकडे उमेदवारी करून वाकबगार झाल्यामुळे, मुळचा फायदा त्यांना मिळत नाही. सुतारकामांतही हा समाज मागे नाही. लांकूड विकत घेऊन घरी स्वतः त्याचे फर्नीचर बनवून मग जत्रांतून ते विक्रीस मांडायचा त्यांचा धंदा अजून जोरांत आहे. गोव्यांत भाजीपाल्याची शेती यांच्याइतकी फायदेशीर करणारा दुसरा समाजच नाही. आणि अत्यंत फायद्याचे असे, मच्छिमारी व नारळाच्या ताडीची दारू गाळणे हे दोन धंदे तर केवळ त्याच समाजाच्या खास मॉनॉपोली आहेत. थोडक्यात सांगावयाचे झाल्यास, हा समाज अत्यंत उद्योगी आहे, असेंच म्हणावे लागते. गोमंतकाच्या आयात निर्गतींतील वार्षिक लाखों रुपयांची तूट, आजवर याच समाजाच्या परदेशगमनामुळे भरून निघत आहे. अर्थात् या दृष्टीने पाहतां, गोमंतकाच्या सांपत्तिक स्थितीत त्याला बरेंच महत्वाचे स्थान आहे. त्यांतही सरस निरस निवडावयाचे झाल्यास, बारदेशी ख्रिस्ती, सासष्टकरांपेक्षां विशेष उत्पादनशील आहेत असे म्हणावे लागते. घरी स्त्रीवर्ग देखील रिकामा नसतो. घरच्याघरी बसल्या बसल्या, निरनिराळ्या पीलोलेसीस, सुताच्या गुंड्या व इतर सुईचे काम, अत्यंत कुशलतेने करण्यांत अभिजात वर्गीय स्त्रियांचा हातखंडा आहेच, परंतु अशिक्षित स्त्रियादेखील आपल्या उपजीविकेचा बोजा कुटुंबावर पडू देत नाहीत व नेहेमी बारदेश प्रांतांत शेतकीचे झाडून सारे लहानमोठे काम ह्या स्त्रियाच करतात.