पान:गोमंतक परिचय.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३ प्रकरण पहिले. हा वर सांगितलेल्या डोंगरांपैकी दुसरा होय. याची उंची फक्त १०५७ फूट आहे. परंतु सभोवतालच्या विस्तीर्ण जागेत तेवढ्या उंचीचा दुसरा डोंगर नसल्यामुळे व वर श्री चंद्रेश्वर भूतनाथ देवाचें सुंदर देवालय असल्यामुळे हा कांहींसा काठेवाडांतील गिरनार पर्वताप्रमाणे दिसतो. त्याच्या उत्तुंग शिखरावरील तें सफेत देवालय, दुरून एखाद्या सापाच्या मस्तकावरील मण्यासारखें शोभिवंत दिसतें. पारोडें गांवांतूनच ह्या डोंगरावर चढण्याची पायवाट आहे व ती ओबडधोबड अशा दगडी पायऱ्यांनी बांधून काढलेली आहे. ती गर्द अशा नारळीच्या बागेतून बऱ्याच उंचीपर्यंत जाऊन पुढे आंब्या फणसाच्या वृक्षांच्या दुतर्फा रांगेतून थेट वर जाते. दुरून पाहणाऱ्या माणसालाहि हे वृक्ष इतर जंगली वृक्षांहून रंगरूपाने भिन्न दिसत असल्याने हा रस्ता जंगलांतून स्पष्टपणे अजमावतां येतो. चढण फार लांब नसली तरी वर जाईतोवर सशक्त तरुणांना निदान पाऊण तास तरी लागतो. देवळाच्या खाली काही अंतरावर देवस्थानच्या सेवेकरी मंडळीची व इतर लोकांचीहि वस्ती असलेले एक लहानसें गांव आहे. हा डोंगर चोहोंकडून आपल्या हृदयांतून मधुर जलाचा पुरवठा करीत असल्याने नारळी, पोफळी व जिराईत कृषीहि वर बरीच आहे. देवळांत वार्षिक चैत्रीपौर्णिमेची जत्रा भरते व तिला हजारों लोक जातात. डोंगरावरची हवा बरीच गार असल्याने जवळच्या लोकांना तो महाबळेश्वर सारखा उपयोगी पडतो. सिद्धनाथाच्या मानाने पाहिल्यास यावरील लोकवस्ती जास्त व घरांची तशीच पाण्याची सोयहि विशेष आहे म्हणून यावर, उन्हाळ्यांत बरीच कुटुंबे दरसाल जाऊन राहत असतात. सारा सासष्टप्रांत, केपेंचा अघशी नदीकडचा भाग व सांगें फोंडेंचा बराच भाग ह्या डोंगरावरून दिसतो. सासष्ट प्रांतांतील नारळीच्या झाडांच्या झालरीने वेष्टित भातशेती, वरून एखाद्या हिरव्या चौकटीच्या गालिचासारखी मधून मधून दिसते. मान उंच करून एखादें घर डोकावून पाहत असल्याचा देखावाहि फारच मनोरम दिसतो. सभोवतालच्या इगर्जाची (चर्च) उंच शिखरें यावरून पाहतांच पुष्कळशा जुन्या नव्या आठवणींनी मन व्यग्र होतें. साधेल त्याने या डोंगरावर एकदा तरी जाऊन यावेंच इतके हे स्थळ मनोरम आहे. नद्याः-गोमंतकांत बहुतेक साऱ्या नद्या सह्याद्रीच्या पहाडांत उगम पावून अरबी समुद्रास मिळतात. ह्या नद्या लांबीच्या मानाने अगदी सामान्य असल्या तरी सृष्टिसौंदर्याच्या दृष्टीने त्यांची बरोबरी करणारी एकही नदी सबंध महाराष्ट्रांत नाही, असे म्हणणे सत्यास मुळीच सोडून नाही. पहाडी प्रदेशांत गोड्या पाण्याने