पान:गोमंतक परिचय.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय सासष्ट बारदेश व तिसवाडी हे कोंसेल्य जरासे सपाट असून त्यांत डोंगर किंवा जंगल फारसें नाही म्हटले तरी चालेल. - डोंगरः-गोमंतकाच्या पहाडी भागांतून, सगळीकडेच सह्याद्रींतून फुटलेले उंच उंच डोंगर दिसतात. परंतु त्यांतून नांव घेण्यासारखा पहाड म्हणजे, गोमंतकाच्या पूर्व सरहद्दीवरील सोसोगड हा होय. सत्तरप्रांतांत सुपे परगण्याच्या सीमेजवळच तो असून त्याची उंची सुमारे ३८२८ फूट आहे. उंचीच्या मानाने ३६३६ फुटांचा 'कालांची मावली' नांवाचा दुसऱ्या नंबरचा पहाडहि सत्तर प्रांताच्या पूर्व सीमेवर सोंसोगडच्या उत्तरेस थोड्याच अंतरावर आहे. वाघेरी हा पहाड सत्तर प्रांतांतच, केरी व झरमें गांवांत, उभा आहे. २२०० फूट उंचीच्या ह्या पहाडावर मधोमधच एक लहानशी जागा गगनचुंबित व दाट झाडीने युक्त अशी आहे. ती दुरून पाहणारास एखाद्या डोंगरी गडासारखी दिसते. जवळच तेवढ्या उंचीवरहि एक गोड्या पाण्याचा संपन्न झरा आहे. ह्या पहाडावरून सारा तिसवाडी प्रांत, बारदेश व सासष्टचा बराच मोठा भाग पाहतां येतो; मोर्लेगड हा डोंगरहि वाघेरीला लागूनच असून त्याची उंची २००६ फूट आहे. १८४७ त इंग्रजी भूगोल मापन खात्याने या डोंगरावर त्रिकोणामितीचा बिंदु निवडला होता. मोरपीर्ल हा बाळ्ळी महालांत असून त्याची उंची १४५७ फूट आहे. या डोंगरावर देखील उत्कृष्ट पाण्याचा झरा आहे. परंतु गोमंतकांतील सर्वांत सुंदर व परिचित असे डोंगर दोनच आहेत. उंचीच्या मानाने त्यांचा क्रम बराच खाली लागत असला, तरी सामान्यतः सपाट प्रदेशाच्या मधोमध असल्याने व इतरहि अनेक कारणामुळे, हे डोंगर गोमंतकांत बरेच प्रसिद्ध आहेत. बोरीचा सिद्धनाथ हा त्यापैकीं जरा उंच आहे. त्याची उंची १२४२ फूट आहे. या डोगरांवर श्री सिद्धनाथाचें एक लहानसें देवालय असून जवळ बरेच झरे आहेत त्यामुळे वर सुमारे २०-२५ घरांचा एक लहानसा गांवच वसला आहे. झऱ्याच्या पाण्याचा उपयोग करून डोंगरावर बरीच जमीन सुपारीच्या लागवडीस आणलेली आहे. डोंगरांत दुर्मीळ वनस्पती पुष्कळ मिळत असून त्याच्या निरनिराळ्या उतरणीवर स्लेटीचे, सहाणेचे, गारेचे असे निरनिराळ्या प्रकारचे दगड सांपडतात. डोंगरावरून सासष्ट कोसेल्य व फोंडा महालचा बराच टापू दिसतो. हवा नेहमी उत्तम असल्यामुळे कधी कधी उष्णकाळांत लोक हवाफेर करण्यासाठी देखील तेथे जातात. पारोडे येथील चंद्रनाथ