पान:गोमंतक परिचय.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय इ. स. १७१५ साली दुसरा एक धुळीत पडलेला हुकूम जारीने अमलांत आला. १५६७ त ख्रिस्ती कौन्सिलकडून झालेल्या ठरावानुसार असाही एक हुकूम सोडण्यात आला होता की, गोवें शहरांतील हिंदूंनी बायबलाच्या उपदेशाच्या वेळी हजर राहिलेच पाहिजे. परंतु त्याची अंमलबजावणी मात्र फारशी झाली नव्हती. उपरोक्त १७१५ साली जेसुइटांच्या प्रोव्हिंसियालने वरील ठराव जारीने अमलांत आणावा, असा ठराव पाद्रीमंडळाकडून (Cabido.) पास करून घेतला. देवळे उध्वस्त झाली, उत्पन्नें, इस्टेटी जप्त झाल्या, संस्कारांची बंदी झाली, भाषेचा नायनाट करण्याचे प्रयत्न झाले, मातापुत्रांची ताटातूट करण्यांत आली, वाहनांची बंदीही झाली, तरी पण धर्मप्रसारकांचा अंतरात्मा शांत झाला नव्हता. कारण अजूनही पाखंड्यांना जीव होता. त्यांनी परसत्तेत देवळे नेली, त्यांनी घरे दारें दुसरीकडे बांधलीं, इस्टेटी पुनः मिळविल्या किंवा न मिळविल्या तरी ते भुकेनें मेले नाहीत. तेव्हां त्यांना निर्जीव व हतप्रभ करण्यासाठी, या कायद्यानुसार त्यांच्या घरांत शिरून, आंतील माणसांना फरफटत खेंचीत नेऊन, बायबलचे प्रवचन चालत असलेल्या ठिकाणी नेण्यांत येऊ लागलें. बायाबापड्यांवर, म्हाताऱ्या कोतान्यांवर, मुलांबाळांवर, ह्या हुकुमानुसार काय काय जुलूम झाले असतील त्यांची कल्पना देखील होणे अशक्य आहे. इंकिझिसांवाने काय केलें ?:-अजून आम्ही कोणत्याच प्रकारची टीका किंवा चर्चा केली नाही. नुसते कायदे व हुकूम यांची जंत्रीच देत आलों आहों. कारण वरील हुकूम वाचतांच चर्चेचे कारणच मुळी राहत नाही. तरीपण ज्यांना ती चर्चा हवी असेल, त्यांनी उपरोक्त नोरोन्य यांचा मूळ ग्रंथच वाचावा. हा ग्रंथ गोव्यांतील उच्च न्यायकोर्टाच्या चीफ जज्जाने लिहिलेला असून तो सरकारी पैशानें, सरकारी छापखान्यांत, पणजी येथे मुद्रण होऊन, सरकारी रीत्याच प्रसिद्ध झाला आहे. इतक्या ह्या गडबडीत धर्मसमीक्षण सभेनें कांहींच का केले नाही, असा प्रश्न वाचक करतील. परंतु ह्या पुस्तकाच्या आकुंचितपणामुळे त्याला येथे सविस्तर उत्तर देतां येत नाही. थोडासा नमुना देत आहो. पाद्रि आंतोनियु व्हियैर नांवाचे जेसुईट कंपनीतील एक गृहस्थ, पोर्तुगीज राजकारणांत बऱ्याच उच्च दर्जाचे मुत्सद्दी व वाङ्मयांतही बरेच मोठे वक्ते होऊन गेले होते. इ. स. १८९७ साली, पोर्तुगालांत त्यांचा त्रिशत सांवत्सरिक उत्सव सरकारी रीत्या मोठ्या समारंभाने साजरा झाला होता. उत्सवांत व्हियैरविषयीं स्तुतिपर भाषण