पान:गृह आरोग्य.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३) जॅममध्ये फळांचा गर वापरतात तरजेलीमध्ये पेक्टिन अर्क वापरतात. मार्मालेड हे जम व जेली मार्मालेड असेल त्यानुसार गर वा अर्क वापरतात. मार्मालेडचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात संत्र्याची साल घातलेली असते. उपक्रम :(१) अन्नप्रक्रिया करणाऱ्या उद्योगास भेट द्या. (२) प्रकल्प भेटीचे प्रेझेंटेशन तयार करा. (३) जेली तयार करतानाच्या प्रत्येक प्रक्रियेची एक स्लाईड करून स्लाईड शो तयार करणे. (४) पॅकेजिंग करणे. (५) मार्केटींग : उत्पादीत जेलीची विक्री करणे. जेली तयार करण्याची पद्धत : फळे पाणी घालून किंवा पाण्याशिवाय उकळून तयार झालेल्या पेक्टिन अर्कात साखर व आम्ल घालून पारदर्शक होईपर्यंत शिजवून जेली तयार करतात. १) फळाची निवड : घट्ट, ताजे, निरोगी, उत्तम रंग व स्वाद असलेले पेक्टिनयुक्त फळ निवडावे. २) पूर्वप्रक्रिया : फळे पाण्याने स्वच्छ धुऊन त्यातील नको असलेल्या बिया, साले इ. काढून टाकावे. कवठ फोडून ठेचावे. ३) पेक्टिन अर्क तयार करणे : फळांचे मध्यम आकाराचे तुकडे करून ते बुडतील इतपत पाणी घालून उकळावे. निम्मे आम्ल घालावे. त्यामुळे पाण्यात पेक्टिन चांगले निघून येते. मधून मधून मिश्रण ढवळावे. मिश्रण दुधाळ झाल्यावर मलमलच्या फडक्यातून गाळून पेक्टिन अर्क भांड्यात काढावा. परत फळाच्या तुकड्यात पाणी घालून हीच कृती दोनदा करावी. सर्व पेक्टिन अर्क एकत्र करून काही वेळ ठेवावे. वरील अर्क हळूच ओतून दुसऱ्या भांड्यात काढावा. ४) पेक्टिन टेस्ट : पेक्टिनचे प्रमाण ठरविण्यासाठी खालील टेस्ट करावी. १ टी स्पून पेक्टिन अर्क वाटीत घेऊन त्यात २ टी स्पून स्पिरीट घालावे. मिश्रण ढवळून काही वेळाने त्याचे निरीक्षण करावे. घट्ट पांढरी गोळी झाल्यास उत्तम पेक्टिन आहे असे समजावे. छोट्या अनेक गोळ्या तयार झाल्यास मध्यम प्रमाणात पेक्टिन आहे असे समजावे. दाट चिकट मिश्रण तयार झाल्यास अगदी कमी पेक्टिन आहे असे समजावे. (टीप : वरील टेस्ट झाल्यावर वाटीतील अर्क व स्पिरीटचे मिश्रण टाकून द्यावे.) ५) साखर घालणे : पेक्टिनच्या प्रमाणानुसार साखर घालवी. उत्तम पेक्टिन असल्यास अर्काच्या पाऊणपट साखर घालावी. मध्यम पेक्टिन असल्यास अर्काच्या निम्मी साखर घालावी. ६) आम्ल घालणे : उरलेले आम्ल घालावे. १ किलो फळासाठी एकूण २ ग्रॅम सायट्रिक आम्ल घालतात. ७) शिजविणे : साखर घातलेले मिश्रण मंद आचेवर शिजवावे व सतत ढवळावे. ८) मिश्रणावर सायीसारखा थर आल्यास तो काढून टाकावा. ९) जेली तयार झाल्याची कसोटी: अ) काट्याची कसोटी- शिजणाऱ्या मिश्रणात काटा बुडवून बाहेर काढल्यास काट्याच्या मधील मोकळ्या जागेत मिश्रणाचे शीट तयार झाल्यास जेली शिजली असे समजावे. ब) शिजणाऱ्या जेलीत तापमापक बुडविला असता १०५ अंश सेल्सियस तापमान असल्यास जेली झाली असे समजावे. १०)जेली भरणे : लाकडी फळीवर कापडाची जाड घडी ठेवून त्यावर रुंद तोंडाची काचेची बाटली ठेवावी. सुरीवरून जेली बाटलीत भरावी म्हणजे हवा आत जाणार नाही. ११) झाकण लावणेः बाटलीवर अर्धवट झाकण ठेवणे, १२) थंड, कोरड्या जागी साठवण करावी.