पान:गृह आरोग्य.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अशाच पद्धतीने स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांसाठी लागणाऱ्या खतांची मात्रा, परीक्षण अहवाल व शिफारशीचा तक्ता यावर आधारित सूत्रावरून नक्की करता येईल. नत्रयुक्त खतातील नत्र पिकांना ताबडतोब उपलब्ध होतो. म्हणून नत्र खते पिकांना देण्याची जास्त आवश्यकता असेल अशावेळी नेमकी देणे जास्त फायदेशीर ठरतात. नत्रयुक्त खते, पिके पेरताना पहिला हप्ता व शाकीय वाढीच्या वेळी दुसरा या पद्धतीने द्यावीत. परंतु स्फुरद व पालाशयुक्त खतांच्या बाबतीत असे होत नाही. ही खते पिकांना हळूहळू उपलब्ध होतात. शिवाय त्यांची मात्राही नत्राच्या तुलनेत कमी लागते म्हणून या खतांचा संपूर्ण हप्ता पिके पेरताना द्यावा. सामू: पिकांच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये जमिनीतून पिकांना उपलब्ध होण्यासाठी जमिनीचा सामू योग्य असणे आवश्यक असते. सामू जर योग्य नसेल तर जमिनीमध्ये अन्नद्रव्ये (नत्र, पालाश व स्फुरद) भरपूर उपलब्ध असूनसुद्धा/खताद्वारे दिलेली असूनसुद्धा त्याचे शोषण पिकांद्वारे योग्य प्रकारे होत नाही व पिकांच्या वाढीवर परिणाम होतो म्हणून पिकांच्या वाढीसाठी सामूचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जमिनीतील उपयुक्त जिवाणुंची वाढ देखील सामूवर अवलंबून असते. त्यामुळे सामूचे निदान करून तो योग्य राखणे अत्यंत गरजेचे आहे. आम्लयुक्त जमिनीची चुन्याची गरज व अल्कलीयुक्त जमिनीची जिप्समची गरज नक्की करण्यासाठी सामूचे निदान करणे अत्यंत आवश्यक आहे. माती परीक्षण अहवालानुसार जर मातीचा सामू आम्ल/अति आम्लयुक्त असेल तर चुन्याची मात्रा (अर्धा ते एक टन प्रती हेक्टर) द्यावी. मातीचा सामू जर अति विम्ल असेल तर जिप्समची मात्रा अर्धा ते एक टन प्रती हेक्टर देऊन जमिनीचा सामू सुधारता येईल. सेंद्रीय कर्ब: सेंद्रीय द्रव्य हे वनस्पतीच्या वाढीसाठी लागणाऱ्या मूलद्रव्यांच्या साठवणीचे केंद्र आहे. सेंद्रीय द्रव्यात जवळपास ५८% कार्बन, ३५% प्राणवायू व ५% नत्र असतो. त्यामुळे सेंद्रीय द्रव्य हे जमिनीच्या उत्पादकतेचा निर्देशांक आहे. सर्वसाधारणपणे उष्णकटीबंधातील, कमी पावसाळी भागात सेंद्रीय कर्बचे प्रमाण कमी असते. महाराष्ट्रातील मध्यभागात पाऊस कमी असतो. याचा परिणाम म्हणून इथे जमिनीतील सेंद्रीय कर्बचे प्रमाण सुमारे १ टक्का किंवा कमी असते. परंतु पावसाळी भागात हे प्रमाण १ ते ३ टक्क्यापर्यंत असते. उष्ण हवामानाच्या भागात सेंद्रीय कर्बाच्या भस्मिकरणाची प्रक्रिया जलद झाल्यामुळे सेंद्रीय कर्बाची घट सतत होत असते. परंतु आर्द्र व मध्यम उष्ण भागात मात्र अशी घट होत नाही. भारतीय अधिकतर शेती उष्ण कटीबंधात व कमी पावसाळा भागात असल्याने इथे सेंद्रीय कर्बाच्या भस्मीकरणामुळे होणाऱ्या कमतरतेचा समतोल राखण्यासाठी कंपोस्ट खत, शेणखत, पालापाचोळा वगैरेचा वापर करणे योग्य ठरते. जमिनीची उत्पादकता ही सोळा अन्नघटकांच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. पिकांसाठी लागणारे सोळा अन्नघटक खालीलप्रमाणे: अ) मुख्य अन्नघटक : १) नत्र (N) २) स्फुरद (P203) ३) पालाश (K20) ब) दुय्यम घटक ४) कॅल्शियम (Ca) ५) मॅग्नेशियन (Mg) ६) गंधक (S) क) सूक्ष्म अन्नघटक : ७) लोह (Fe) ८) मँगेनीज (Mn) ९) तांबे (Cu) १०) जस्त (Zn) ११) मॉलिब्डेनम (Mo) १२) बोरॉन (B) ड) नैसर्गिकरित्या उपलब्ध होणारे घटक : १३) कार्बन (C) १४) हायड्रोजन (H) १५) ऑक्सिजन (O) १६) क्लोरिन (CI) ७८