पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
४७४
गीतारहस्य अथवा कर्मयोग

कवि शिलर यानें याच मासल्याचा एक प्रसंग आपल्या ‘वुइल्यम टेल्’ नांवाच्या नाटकाच्या अखेरीस वर्णिला आहे, आणि तेथे त्यानें बुद्धीच्या शुद्धाशुद्धतेमुळे दोन बाह्यतः समसमान कृत्यांत होणारा जो भेद दाखविला आहे तोच स्वार्थत्याग आणि स्वार्थहत्त्या या दोहोंमधलाहि भेद आहे. कर्मे लहानमोठीं असोत वा समसमान असोत, त्यांच्यामध्यें नैतिकदृष्टया जो भेद पडतो तो कर्त्यांच्या हेतूमुळे पडत असतो, असें यावरून व्यक्त होतें. या हेतूसच उद्देश, वासना, किंवा बुद्धि असें म्हणतात. कारण, बुद्धि या शब्दाचा व्यवसायात्मक इंद्रिय असा जरी शास्रीय अर्थ असला, तरी ज्ञान, वासना, हेतु, ही सर्व बुद्धीन्द्रियांच्या व्यापाराचीच फलें असल्यामुळे त्यांनाहि बुद्धि असें म्हणण्याचा प्रघात असून, स्थितप्रज्ञाच्या साम्यबुद्धींत व्यवसायात्मक बुद्धीची स्थिरता आणि वासनात्मक बुद्धीची शुद्धता या दोहोंचाहि समावेश होतो हें पूर्वी सांगितले आहे. युद्ध केल्यानें किती मनुष्यांचे केिती कल्याण होईल आणि किती लोकांचे किती नुकसान होईल हें पहा, असें अर्जुनास भगवंतांनी सांगितलें नाहीं. उलट भगवान् असें सांगतात की, तुझ्या युद्ध करण्यानें भीष्म मरणार का द्रोण मरणार हा विचार गौण आहे. तूं कोणत्या बुद्धीनें युद्ध करण्यास उभा राहिला आहेस हा मुख्य प्रश्न होय; व तुझी बुद्धि जर स्थितप्रज्ञाप्रमाणे असेल तर त्या शुद्ध व पवित्र बुद्धीनें आपलें कर्तव्य करीत असतां भीष्म किंवा द्रोण मेले तरी त्याचे पाप तुला लागणार नाहीं. भीष्माला मारण्याची फलाशा धरून त्यासाठी म्हणून तुम्ही युद्ध करीत नाही. तुम्हांस जन्मत:च हक्कानें प्राप्त झालेल्या राज्याचा विभाग तुम्ही मागितला, व युद्ध टाळण्यासाठीं होईल तितकी पड घेण्यासहि कर्म केलें नसून सामोपचाराच्या मध्यस्थ्याहिं केल्या. पण शिष्टाईच्या व साधुपणाच्या या मागीनें जेव्हां निभाव लागेना तेव्हां नाइलाजास्तव तुम्ही युद्धास प्रवृत्त झालां यांत तुमचा कांही दोष नाही: कारण, दुष्टाजवळ आपल्या धर्म्य हक्कासाठी ब्राह्मणाप्रमाणे भिक्षा मागत न बसतां जरूर पडल्यास अखेर क्षात्रधर्मीप्रमाणे लोकसंग्रहार्थ सदर हक्क युद्धानें संपादन करणें हें तुमचें कर्तव्य होय (मभा.उ.२८व ७२; आणि वनपर्व ३३.४८ व ५० पहा). भगवंतांचा हा युक्तिवाद स्वीकारूनच व्यासांनी पुढे शांतिपर्वात युधिष्ठिराचे समाधान केले आहे (शां. अ.३२ व३३). परंतु कर्माकर्मनिर्णयार्थ बुद्धि जरी याप्रमाणे श्रेष्ठ मानिली तरी शुद्ध बुद्धि म्हणजे काय हें आतां सांगणे जरूर आहे. कारण, मन व बुद्धि हे दोन्ही प्रकृतीचे विकार असल्यामुळे ते उपजतच सात्त्विक, राजस व तामस असे तीन प्रकारचे असू शकतात. म्हणून बुद्धीच्याहि पलीकडचा जो नित्य आत्मा त्याचे सर्वाभूतीं एकच असणारें स्वरूप ओळखून त्याप्रमाणे कार्याकार्याचा निर्णय करणारी जी बुद्धि तिलाच या शास्रांत शुद्ध किंवा सात्त्विक बुद्धि म्हणावें