पान:गांव-गाडा.pdf/99

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७८      गांव-गाडा.

रोजनिशी ठेवावी असा हुकूम आहे. सरकारच्या सर्व निरनिराळ्या खात्यांचे तोंड गांवांत येऊन जाऊन पाटील-कुळकर्ण्यांवर पडते. तरी साधारणतः गांवच्या दप्तरांत पाऊण हिस्सा काम मामलेदाराचे व चौथा हिस्सा इतर खात्यांचे असते.

 मुलकी खात्याने गांवच्या दप्तराचे अठरा मुख्य नमुने केले आहेत, व जरूरीप्रमाणे मुख्य नमुन्यांना कित्येक पोटनमुनेही जोडले आहेत. दर तीस वर्षांनी सर्व्हेखात्याने गांवचा आकारबंद तयार केला म्हणजे त्यावरून कुळकर्णी शेतवार पत्रक उतरून घेतो, आणि कारणपरत्वें वेळोवेळी खात्यांत जसजसे बदल होतील तसतसे ते त्यांत नोंदून ठेवतो. शेतवार पत्रकांत काळी-पांढरीच्या क्षेत्राची, आकाराची, व खातेदारांची सर्वप्रकारची माहिती असते. त्याला नमुना नंबर १ म्हणतात. दर पांच वर्षांनी जमिनीवरील हक्कांची नोंद कुळकर्णी करतो,आणि नमुना नंबर १ क उर्फ हक्कनोंदणीचें रजिस्टर तयार होते. त्यांत वेळोवेळी जे फरक होतात ते नमुना नंबर १ ड मध्ये दाखल होतात, व सालाबादची पीकपाहणी, आणि भाडे-पट्टे नमुना नंबर १ इ मध्ये येतात. सरकारी पडपाहाणी, गवत-लिलांव व वन-चराई नमुना नंबर २ मध्ये, आणि बांध-वरुळ्यांची पाहणी नमुना नंबर ३ मध्ये नोंदलेली असते. दरसाल जिराईत-बागाईत पिकांची क्षेत्रवारी नमुना नंबर १६ व १६ अ मध्ये आणि तळीं-विहिरींची पांच साली नोंद नमुना नंबर १५ मध्ये असते. पांच साली जनावरांची खानेसुमारी नमुना नंबर १३ मध्ये असते. वरील पत्रकांना शेतकी पत्रके म्हणतां येतील. कबजेदार-वार खतावणी नमुना नंबर ५, जमीनबाब व तगाई लावणी पत्रक नमुना नंबर ६ व ६ अ, पावतीसह जमीनबाब व तगाई कीर्द नमुना नंबर ११ व ११अ असे नगदीचे मुख्य कागद होत. ह्यांशिवाय कमजास्त पत्रक, तक्रार-कैफियती इनामपत्रक, चलने वगैरे नगदी कागद असतात. ह्या सर्वांवरून जमाबंदीचा मुख्य कागद ताळेबंद ऊफे ठरावबंद नमुना नंबर १० तयार होतो, आणि तो प्रांतसाहेब किंवा कलेक्टर यांनी पसंत केला