पान:गांव-गाडा.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वतन-वेतन.      ७९


म्हणजे त्याबरहुकूम गांवचा वसूल होतो. देवी, पटकी, प्लेग, जनावरांचे रोग इत्यादि गांवीं चालू असतांना त्यांबद्दल दररोज रिपोर्ट करावा लागतो. नमुना नंबर १४ मध्ये जन्ममृत्यूची नोंद असते. वळू घोड्यांची उत्पत्ति, ऊस, कापूस, तीळ, जवस, गहूं वगैरे विशेष पिकें, पाऊस व निरख ह्यांचे तक्ते गांववार तयार होतात. गांवच्या कोंडवाड्याचा हिशेब गांवकामगार ठेवतात. वारचा वतनदार, खातेदार, कबजेदार, पेन्शनर, नेमणूकदार वगैरेंचा मृत्यु, धार्मिक बाबींकडे दिलेल्या इनामजमिनीचा उपयोग गैर उपयोग, वहिती जमिनीचा व तगाईंचा गैर उपयोग वगैरेंबद्दल कुळकर्ण्यांला रिपोर्ट करावे लागतात. इनाम व खाते ह्यांची अदलाबदल, वारस चौकशी, तगाई चौकशी, गांवकऱ्यांची जागा किंवा जमीन सरकारी अगर सार्वजनिक कामाकडे घेतल्यास तिच्या नुकसानभरपाईची चौकशी वगैरेंसंबंधाने लोकांसह पाटील-कुळकर्ण्यांना चौकशी अंमलदारांचे कचेरींत हजर रहावे लागते. सरकारी जागा, झाडे ह्यांचे रक्षण; निवडुंग काढणे व त्याबद्दल वर्गणी वगैरे गोळा करणे; खाणी, दगड, वाळू ह्यांची विक्री; प्राप्तीवरील कर, नाव, दारू, अफू, गांजा, दुकानें वगैरेंबद्दल माहिती; पलटणीसाठी बैल, गाड्या, सुतार, लोहार, नालबंद, वगैरेंची माहिती; टोळ वगैरेबद्दल माहिती व बंदोबस्त; इत्यादि संबंधाने कागदपत्रे कुळकर्ण्यांला तयार करावी लागतात. वसूल न आला तर नोटिसा, जप्ती, पंचनामे वगैरे कागद व कामें त्याला करावी लागतात. लोकलबोर्डाकडील पाण्याची कामें, चावडी, धर्मशाळा, शाळागृह इत्यादिकांच्या मक्त्यांच्या चौकशीच्या कामी त्यांना जाबजबाबासाठी हजर रहावे लागते. मामलेदाराचे 'मदत' किंवा 'कबजा' कोर्टाच्या हुकूमनाम्याची बजावणी पाटील-कुळकर्णी करतात. स्थानिक वस्तुस्थितीप्रमाणे कस्टम, अबकारी, मीठखात्यांचे कामही गांवकामगारांना पडते. जंगलसंरक्षण, चराई, तरवड, शेण्या वगैरेचे लिलांव, आग, नुकसानी, गुन्हे वगैरेंचे पंचकयास, इत्यादि जंगलखात्यांची काम पाटील-कुळकर्णी करतात. पाटबंधाऱ्यासंबंधानें इरिशन-खात्याला, देवी काढण्यासंबंधानें देवीखात्याला,