पान:गांव-गाडा.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वतन-वेतन.      ७७


वर मिळतो, तो असाः--१ ते १०० दोन रुपये, पुढे १००० पर्यंत शेकडा एक रुपया आणि पुढे दर २०० लोकसंख्येस एक रुपया. विस्तार, चव्हाटा, बाजार, आल्यागेल्यांची वर्दळ, कामाची जिकीर इत्यादि कारणांवरून खेड्यांचे चार वर्ग केले आहेत. ह्या वर्गवारीवरं पाटलांना दरसाल मुशाहिरा मिळतो तो असाः-गांव चौथे वर्गात असेल तर दहा रुपये, तिसऱ्यांत वीस रुपये, दुसऱ्यांत तीस रुपये व पहिल्यांत पन्नास रुपये. कुळकर्ण्यांला वसुलावर येणेप्रमाणे 'कागद-बहा' आकारतात. १ ते २० रुपये वसुलापर्यंत एक रुपया, २१ ते ५० पर्यंत दोन रुपये, ५१ ते १०० पर्यंत अडीच रुपये व पुढे १५०, २००, २५०, ३००, ५०० प्रमाणे वाढव्यावर आठ आणे. इन्कमट्याक्स, तगाई ह्यांच्या वसुलावर पाटील-कुळकण्यांना काही मिळत नाही. तारीख २८।७।१९१३ चे मुंबई कायदे कौन्सिलच्या बैठकीत नामदार बेळवी ह्यांच्या प्रश्नास सरकारतर्फे मिळालेल्या उत्तरावरून असे दिसते की, कुळकर्ण्यांना सरासंरीने ६८ रुपये वार्षिक मुशाहिरी मिळतो. पाटलाला अर्थात् ह्यापेक्षा कमी पडणार.

 सरकार-उपयोगी गांवकामगारांत पाटील-कुळकर्णी प्रमुख आहेत. गांवचा सर्व सरकारी व्यवहार त्यांच्यामार्फत चालतो. राज्याची शिस्त जसजशी बसत गेली, राजाधिकारांची विभागणी होऊन निरनिराळी खाती आस्तित्वात आली, आणि प्राचीनं पौर्वात्य व्यवहार आधुनिक पाश्चात्य सुधारणेच्या वर्चस्वामुळे बदलून लोकांच्या गरजा वाढल्या, तसतसें गांवचे दप्तर फुगत चाललें. म्हातारकोतारे पाटील-कुळकर्णी मागच्या गोपाळ-कथा सांगतात की, अव्वल इंग्रजीत कुळकर्णी वसुलाच्या दोन हप्त्यांच्या वेळेला दप्तरची गांठ सोडी, एक इरसालीने संबंध गांवचा भरणा तालुक्यांत पाठवी, आणि जमाबंदीखेरीज गांवची शीव क्वचित ओलांडीत असे. आतां दप्तर सोडल्याशिवाय एक दिवस जात नाही. आणि गांव सोडल्याशिवाय एक आठवडा लोटत नाही. गांवच्या दप्तरचें काम कुळकर्णी नीट करतो की नाही हे समजावें, म्हणून त्याने कामाची