पान:गांव-गाडा.pdf/78

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गांव-मुकादमानी.      ५९

रांत त्यांचे पिढीजाद वजन असे. जोपर्यंत मामलतीवर जमेदारांच्या नेमणुका होत तोपर्यंत रावापासून तो रंकापर्यंत जणों काय एकीशी एक अशा पायऱ्या लागून राहिल्या होत्या,आणि रांगेने किंवा ओघानें कोठेंना कोठे तरी सर्वांचा पल्ला पोहचे, व दुःखपरिहार होई.

 मुलकीप्रमाणे गांवचे फौजदारी अधिकारही पाटलाला होते, आणि मुलकी कामांत जे त्याचे मदतगार व वरिष्ठ तेच फौजदारी कामांत असत. ह्या कामांत त्याला मुख्य मदत जागल्याची असे, आणि त्याचा वरिष्ठ मामलेदार होता. कुळकर्णी दप्तरचे काम करी आणि जागल्या गांवचा बंदोबस्त ठेवी. बलुतें, शेव वगैरेसाठी चोहोंकडे पायपीट आणि चटपटलटपट करण्याचा महार जागल्यांना बालाभ्यास असतो; व ते माणसाचें पाणी तेव्हांच जोखतात. जागले वहिमी जातीचे असतात. 'चोराच्या हवालीं किल्ल्या' हे तत्त्व त्यांच्या नेमणुकीच्या मुळाशी असावें. गांवचे सर्व बदमाष जागल्याला माहीत असत. गांवाच्या शिवेंत झालेल्या चोरीचा पत्ता लावण्याची 'बाप दाखीव नाहीं तर श्राद्ध कर' असली जबाबदारी त्यावर असे. चोरीचा माग शिवेच्या बाहेर निघाला नाही तर जागल्याकडून चोरी भरून घेत; आणि जर ऐवज त्याच्या ऐपतीबाहेर असला तर बाकीची भरपाई गांव करून देई. त्याने मुद्देमाल काढून दाखविला किंवा दुसऱ्या गांवाच्या शिवारापर्यंत माग नेऊन भिडविला की, त्याच्या गळ्याचे पेंडें सुटे आणि तें सदर गांवाच्या जागल्याच्या गळ्यांत पडे. असें होता होतां ज्या गांवापुढे माग जात नसे त्या गांवाला चोरी भरून द्यावी लागे. जागले पाटलांची कसूर किंवा सामलात दिसून आल्यास त्यांचे इनाम काढून ते त्यांच्या बिरादरांना देण्यांत येत. गुन्ह्याच्या तपासांत आरोपी कबूल व्हावा, त्याने मुद्देमाल काढावा, व आपल्या साथीदारांची नांवें सांगावीत म्हणून त्याला मारपीट करून त्याचे फार हाल करीत; आणि मारहाणीच्या निशाण्या त्याच्या अंगावर दिसून येऊ नयेत अशी खबरदारी घेत. स्वतः किंवा पंचामार्फत फिर्यादीचा निकाल लावून अपराध्याला दंड, कैद करण्याचा अधिकार पाटलाला असे. पेंढारी,