पान:गांव-गाडा.pdf/77

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८      गांव-गाडा.

देशमुख देशपांड्ये ह्यांमधील देवाण-घेवाणीचा सौदा होता. जमाबंदी मुक्रर होईपर्यंत गांवची पिकें हवालदारांच्या जाबत्यांत असत. पट्टीचा हप्ता चुकला म्हणजे शेकदार पाटलाच्या मदतीला शिबंदी पाठवी. ज्याकडे बाकी राही त्याला ती चुकवीपर्यंत मोहसल्ली (महसूल करणारा शिपाई) तगादा करी, चावडींत कोंडी, त्याच्या डोक्यावर धोंडा देई, त्याचे चुलात पाणी ओती, त्याचा दाणापाणी बंद करी म्हणजे त्याला नदी-विहिरीवर पाण्याला जाऊ देत नसे. इतक्यानेही तो वठणीवर न आला तर त्याला मामलेदाराकडे पाठवीत. मामलेदार त्याला कैद करी, त्याची गुरे ढोरें वगैरे जंगम मालमत्ता विकी, पण ती विकतांना त्याला खाण्यापिण्याला राखून ठेवी, व स्थावर विकीत नसे. गांवच्या सरकारदेण्याची हमी गांववार असल्यामुळे काही कुळे नादार किंवा परागंदा झाली तर त्यांजकडील येणे बाकीच्यांवर फाळून चुकवावे लागे. क्वचित् प्रसंगी संभावित गांवकऱ्यांना ओलीस धरून नेत. तेव्हां पाटील व गांवकरी एखाद्या भरदार किंवा गरजू कुळाची जमीन विकून बाकी चुकवीत व त्यांना सोडवून आणीत. सबंध गांवानें पट्टी दिली नाही तर गांवावर स्वार दवडण्यांत येई, आणि 'शिलकावणे' (ज्याच्याकडे तगाद्याला शिपाई पाठवावयाचा त्याच्याकडून त्याची पोटगी घेणे ) बसविण्यांत यई. एवढ्याने भागले नाही तर खुद्द पाटलाला तगादा लागे, व नाठाळ कुळाच्या सर्व यातना त्याला भोगाव्या लागत. सारांश, गांवाच्या मुलकीं कामांच्या सुखदुःखाचा पूर्ण अधिकारी पाटील होता. ह्या महसुली पद्धतींत मामलेदारांना व त्यांच्याआडून इतर वतनदारांना अवदानें मारण्याला पुष्कळ जागा होती. मामलतीवर जहागीरदार, इनामदार, देशमुख, देशपांड्ये वगैरे जमेदारी पेशांच्या लोकांची नेमणूक होत असे. ह्या वर्गाची जाळी-मुळे रयतेशी जखडली असल्यामुळे सर्व प्रकारच्या भल्याबुऱ्या लोकांशी त्यांचा संबंध येई, व गोरगरीबांची हलाखी त्यांना कळत असे. तेव्हां ते रयतेची दाद घेत व लावीत, आणि मागचा पुढचा विचार पाहून लोकांची मने मिळवून मामलतीचे काम करीत. लोकांत व सरका-