पान:गांव-गाडा.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६०      गांव-गाडा.

लुटारू जाती, सशस्त्र हल्ला, अगर बंड ह्यांचा प्रतिकार करण्यासाठी पाटील सबंध गांवाची मदत घेई, अगर प्रसंगविशेषीं गांवच्या महार जागल्यांच्या जोडीला शिबंदी, बारगीर, स्वार चाकरीस ठेवून पुंडावा मोडी. मुलखात शांतता राखण्यासाठी मामलेदारांच्या ताब्यांत शिबंदी व बारगीर होते, आणि ते बंडाळी मोडीत. ह्याखेरीज भील, रामोशी वगैरे तस्कर-जातींच्या नायकांकडून मामलेदार जामीन घेत. परंतु एका दोरींत राज्यव्यवस्था नसल्यामुळे गुन्हेगारांचे चांगलेच फावे. एका प्रांतांतून हुसकून लावलें तर त्यांना दुसरीकडे आसरा मिळे. पुष्कळ छोटेखानी राजे, इनामदार, पाटील वगैरे दरोडखोरांना पाठीशी घालुन गबर होत. कामदार लोकही गोरगरीबांवर आळ घालून पैसे उपटीत, व लांच खाऊन खऱ्या गुन्हेगारांना सोडून देत. श्रीसमर्थाचा अनुभव असा आहे: कोणी एके ग्रामी अथवा देशीं । राहणे आहे आपणाशी । न भेटतां तेथल्या प्रभुशी । साख्य कैंचें ॥ त्यास न भेटतां त्याचे नगरीं । राहतां धरतील बेगारी । तेथें न करतां चोरी । अंगी लागे ॥ -दासबोध.

 दीवाणी कामांत पाटील, मामलेदार, सरसुभेदार व शेवटी पेशवे अशा पायऱ्या होत्या; खेरीज शहरोशहरी न्यायाधीश नावाचे अधिकारी नेमले होते. पाटलाकडे फिर्याद नेली म्हणजे तो प्रतिवादीला बोलावी,

-----

 -१ धुळ्याचे रा०रा० भट यांच्या मते समारे तेराशे वर्षांपासून दिवाणी, फौजदारी व्यवहारांचा निर्णय करणाऱ्या महाराष्ट्रीय संस्था गोत, देशक, न्यायाधीश. व राजा या होत्या. गोत म्हणजे गांवांतील निरनिराळ्या जातीच्या व धंद्यांच्या लोकांची सभा. ती सर्व जातींच्या लोकांच्या गांवकी स्वरूपाच्या वादाचा निवाडा करी, व पाटील वगैरे अधिकाऱ्यामार्फतच तिच्याकडे फियाद आली पाहीजे असा निबंध नसे. तिच्या निवाड्यास थळपत्र, गोतपत्र, किंवा गोत-महजर म्हणत. गोताने दिलेल्या निवाड्याचा पुन्हां निर्णय करण्याचा व प्रांतिक स्वरूपाच्या व्यवहाराचा निर्णय करण्याचा अधिकार देशकास असे, आणि त्याच्या निवाड्यास देशकाचा किंवा परगण्याचा महजर म्हणत. गोत व देशक ह्यांच्या वरिष्ठ न्यायाधीश व राजा हे होते.