पान:गांव-गाडा.pdf/43

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२४
गांव-गाडा.


सुतार, बुरूड, साळी, कोष्टी, चवाळे विणणारे सनगर, धनगर, ह्या जाती धंद्याला लागणाऱ्या निरनिराळ्या जिनसांवरून पडलेल्या दिसतात. ढोर, चांभार, महार, होलार व मांग चामड्याच्या मुख्य धंद्याची पोटकामें करतात, तरी त्यांच्या जाती निराळ्या आणि त्यांतही उच्चनीच भाव आहे. ज्या ढोरांनी जोडे करण्याचे काम पत्करलें ते चांभार झाले; आणि ज्या चांभारांनी महारमांगांचे सुद्धा जोडे करण्याचे पत्करलें ते होलार झाले. महार संबळ वाजवितील पण कड्यावर थाप मारणार नाहीत. मांग कडे वाजवितात पण ढोल किंवा डौर वाजविणे कमी दर्जाचे समजतात, तो मांग गारोडी वाजवितात. भिल्ल, कोळी ह्यांसारख्या अनार्य जातींनी आर्यांना विरोध केला, आणि त्या लूटमार करून राहिल्या. त्यांना आर्यातले दुराचरणी लोकही मिळाले असावेत. आज ज्या अनेक गुन्हेगार जाती आपणांला दिसतात त्या दुराचारी आर्य-अनार्य व संमिश्र जातींचे वंशज होत. गुन्हे करणे हा आपला जातिधर्म आहे असें सदर जाती मानतात. क्षेत्रशुद्धीबद्दल प्रत्येकाला काळजी असते, तरी या न्यूनताप्रचुर जगांत व्यभिचारी लोक असावयाचेच. आपल्या जातीची नीति बिघडू नये म्हणून वरिष्ठ जातींनी आपल्या कामवासना कनिष्ठ जातींतल्या स्त्रियांकरवीं तृप्त केल्या, किंवा आपल्यांतल्या मोळा सुटलेल्या स्त्रियांची स्वतंत्र जात होऊं दिली. ह्यामुळे खानदेशकडील हरदास, बऱ्हाणपुराकडील रामजानी व गंगथडीकडील कोल्हाटी ( कुलटा = निसवलेली स्त्री. ) आणि मुसलमानांतील कसबी वगैरेसारख्या जारकर्में करणाऱ्या जाती निर्माण झाल्या. व्यभिचार हाच आपला जातिधर्म असें ह्या जाती मानतात. मुसलमानांचें पाऊल हिंदीस्तानांत पडण्यापूर्वा गुरे मारण्याचे काम हिंदू खाटिक करीत. मुसलमान दृष्टीस पडल्याबरोबर त्यांनी ते सोडले आणि मुसलमान खाटिकांना 'मुलाना' हा किताब देऊन बकरें लावण्याचें ( कापण्याचे ) काम त्याच्या गळ्यांत अडकविलें. विशेषतः असे दिसून येते की, मूळ जातींतल्या धंद्यांतली