पान:गांव-गाडा.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वतन-वृत्ति.      २३


व्यवसाय, संप्रदाय, धर्ममत अगर उपासना ह्यांपुरता स्वतंत्र पंथ निघे, व अजूनही हेच चालले आहे. इतर व्यवहारांत सामान्य जात त्याला दूर धरीत नसे व नाही. परंतु अल्पसंख्याक समाज आपले हितास अतिशय जपतात असा नियम आहे, त्याप्रमाणे नवीन पंथच जातीच्या सामान्य हितापेक्षा आपल्या हिताकडे जास्त लक्ष देतात व वेगळं होण्याचे तयारीस लागतात. ह्याप्रमाणे समाजाचे तुकडे होता होतां शेवटी निरनिराळे कुलाचार पडत जाऊन ते कुलधर्म होऊन बसले; आणि एरवी सर्व प्रकारें एक अशा कुळांत सुद्धा फूट पडली व बारा पुरभय्ये आणि चौदा चुली अशी समाजाची स्थिति झाली. जातींच्या किंवा पंथांच्या विभक्तपणाच्या सहस्रावधि कारणांचा शोध केला तर तो अतिशय बोधप्रद व मनोरंजक होईल, आणि त्याची छाननी करून त्यांतील तथ्यांश समाजापुढे सप्रमाण मांडला तर जातिभेदाची तीव्रता कमी करण्यास त्याचा पुष्कळ उपयोग झाल्यावांचून राहणार नाही.

 अगदी वरवर पाहणाराला सुद्धा ही गोष्ट कबूल करावी लागेल की, ब्राह्मणादिकांच्या बहुतेक जाती वस्तिपरत्वें झाल्याः- मारवाडी ब्राह्मण, कोंकणी मराठा, गुजराती न्हावी, परदेशी कुंभार इत्यादि. ज्या ब्राह्मणांनी नागवेलीची पानें खुडण्याचे टाकून दिले नाही त्यांची तिरगुळ ब्राह्मण म्हणून एक पोटजात झाली. ज्या क्षत्रिय-वैश्यांनी विधवावपन, पुनर्विवाह वगैरे चालू केले ते आपल्या वर्णबंधूंतून फुटून बाहेर पडले. गुरव, भोप्ये, गोंधळी, आराधी, भुत्ये, भराडी, डोरे गोसावी, वाघ्ये वगैरे पुजारी जातींचे भेद देवदेवतांवरून झालेले दिसतात. शंकराची पूजा प्रमुखत्वें गुरव करतात, तशी देवीची भोप्ये, गोंधळी, भुत्ये किंवा आराधी, भैरवाची जोतीबाची भराडी किंवा डौरे गोसावी, खंडोबाची वाघे करतात. पिराला भजणारे व मानभावाचा अनुग्रह घेतलेले लोक ब्राह्मणेतर जातींत पुष्कळ आहेत, आणि त्यामुळे त्यांचे वेगवेगळाले पंथ झाले आहेत. पांचाळांकडे पाहतां सोनार, तांबट, कासार, लोहार, जिनगर, घिसाडी, ह्या जाती धातूंवरून पडल्या असाव्यात.