पान:गांव-गाडा.pdf/41

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२      गांव-गाडा.


नुसार ज्या त्या वर्णातले लोक सामान्य धर्मापेक्षा आपापल्या वर्णविशेष धर्माला जास्त भजू लागले. धंद्याच्या स्वरूपावरून एक धंदा दुसऱ्या धंद्यापेक्षा अधिक पवित्र व मानार्ह अशी धंद्यांची प्रतवारी लागून अखेर एकाच धंद्यांतील-अमुक काम उच्च व शुद्ध किंवा सिद्ध अशी त्यांतल्या त्यांत कामांची वर्गवारी लागली. ह्यामुळे वर्णाश्रमधर्माची विभक्तता दृढ होऊन पूर्वीच्या एकजीव समाजाचे लोक निरनिराळ्या वर्णात व उपवर्णात एकमेकांपासून तुटक नांदू लागले; आणि ज्याने त्याने आपापल्या वर्णीतच शरीरसंबंध व अन्नव्यवहार केला पाहिजे, ज्याचा ज्या वर्णात जन्म त्याच वर्णाचा व्यवसाय त्याने वर्णधर्म म्हणून केला पाहिजे, इतर व्यवसाय करणे अधर्म होय, असले कडक नियम अमलांत आले. त्यांनी प्रथम समाजांतील सर्व वर्णात होणारा बेटीव्यवहार नंतर रोटीव्यवहार नंतर शिवताशिव कमी केली; आणि चार वर्णातून अनेक उपवर्ण ऊर्फ जाती उत्पन्न केल्या. वर्णांप्रमाणे जातिजातींचेही विवक्षित धंदे व आचार पडत गेले, आणि ते जातिधर्म म्हणून ज्या त्या जाती पाळू लागल्या. जातींतल्या काही लोकांनी कांहीं धंद्यांतून किंवा मूळ धंद्याच्या घाणेरड्या किंवा त्रासदायक भागांतून अंग काढून घेतले. तसें ज्यांनी केले नाही किंवा असली कामें ज्यांनी पत्करली, त्यांच्या कमी दर्जाच्या पोटजाती बनूं लागल्या. वर्णातून ज्या कारणांनी जाती निघाल्या, त्याच कारणांनी जातींतून पोटजाती निघाल्या, आणि रूढीने सर्व व्यवसाय, पोटव्यवसाय व त्यांतील निरनिराळी कामें ह्यांना जातिधर्माचे स्वरूप देऊन टाकले. ही समाजविभंजक परंपरा जाति पोटजातींवर मुक्काम करती तरी बरे होते. एखाद्या जातीने दुसऱ्या एखाद्या जातीचा किंवा पोटजातीचा व्यवसाय किंवा आचार उचलला, किंवा जाणून बुजून अथवा नकळत आचारस्खलन केलें, किंवा मूळ धर्माहून किंचित भिन्न असा एखादा उपधर्म किंवा संप्रदाय पत्करला, किंवा शेजारी नांदत असलेल्या परधर्माच्या मतांपैकी किंवा उपासनेपैकी एखादा भाग स्वीकारिला, की त्या जातींत अगर पोटजातींत तट पडत; व तेवढा आचार,