पान:गांव-गाडा.pdf/40

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वतन-वृत्ति.      २१


असल्यामुळे, आणि धंद्याची सर्व प्रकारची पूर्व तयारी करून बसल्यामुळे नव्हे तो अगोदरच रेघारूपास आणिल्यामुळे वडिलांनाही असे वाटणे सहाजिक आहे की, मुलाने तोंडांत आलेला घांस टाकून नवा पाव नवा डाव न करता आपल्याच धंद्यांत पडावें. ह्याप्रमाणे सौकर्याच्या दृष्टीने वडिलार्जित धंदे चालविण्यास चालू व भावी पिढ्या सारख्याच आतुर असतात, आणि समाजही ह्या स्थितीस अनुकूल असतो असे म्हटले तरी चालेल. विशेष कारण नसतांना कारखानदार आणि कारखाने वरचेवर बदलले तर, कालावधीने, अनुभवाने किंवा अनुवंशाने प्राप्त होणाऱ्या कसबास व प्राविण्यास समाज मुकतो. जोपर्यंत कसब सोपें व साधे असते आणि त्यांत कलाकुसरीचा व व्यक्तिसंपादित प्राविण्याचा भाग फारसा नसतो, तोपर्यंत वंशपरंपरेने धंदे अव्याहत चालले तरी समाजाच्या गरजा विशेष अडचण किंवा तोटा न येतां भागतात.

 आमच्यांत अशा प्रकारे पिढ्यानपिढ्या धंदे चालविणारी विवक्षित घराणी केवळ समाजसुव्यवस्थेसाठी निघाली, आणि जरी ती मूळची एकाच समाजांतली किंवा त्या समाजांत अंतर्लीन झालेली असली, तरी कालांतराने आद्य ऐक्याची भावना कमजोर आणि विभक्तपणाची भावना बलवत्तर होत जाऊन त्यांचे वेगवेगळाले संघ झाले. हेच आमचे वर्ण होत. पूर्वीची वर्णव्यवस्था सैल असून तिच्यामध्ये धंद्याची अदलाबदल करण्यास किंवा अमुक धंदा करणाऱ्या आईबापांच्या पोटी जन्म घेतल्यामुळे त्यांचा धंदा सोडून दुसरा धंदा करण्यास मनाई नव्हती; म्हणजे वर्णव्यवस्था जन्मसिद्ध नव्हती. पुढे जसजसा समाज वाढला व पांगला, तसतशी ह्या संघांची बंधनें एकमेकांपासून दुरावत गेली, आणि भिन्न भिन्न आचार रूढ होत गेले. त्यांपैकी कांहीं आचार केवळ यदृच्छेनें, कांहीं व्यवसायपरत्वे, कांही देशकालमानाने व काही मतभेदानें प्रचारांत आले असले, तरी त्या सर्वांना व त्यांना मूलभूत जो व्यवसाय त्याला धर्माचें स्वरूप येऊन वर्णाश्रमधर्म सर्वसामान्य धर्माच्या जोडीला येऊन बसला. सामान्यापेक्षा विशेषाचे जेथल्या तेथे माहात्म्य जास्त असते, ह्या नियमा-