पान:गांव-गाडा.pdf/39

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वतन-वृत्ति.
----------------

 कोठेही केव्हाही जा, बापाचा धंदा मुलाने उचलला नाही, असें कचित् दृष्टीस पडते. बहुतेक ठिकाणी व प्रसंगी असेंच पाहाण्यांत येतें की बाप वैद्य असला तर मुलगाही वैद्यकी करतो; बाप सराफ किंवा जव्हेरी असला, तर मुलगाही बापाची गादी चालवितो. बापाचा कारकुनी किंवा शिपाई पेषा असला तर मुलगाही कलमबहाद्दर किंवा तरवारबहादर होण्याची ईर्षा धरितो. लक्षावधि धंदे अस्तित्वात असतांना व त्यांत हरघडी शतशः भर पडत असतांना आणि ते शिकण्याची साधने व सोयी विपुल व मुक्तद्वार असतांना जर आज आपणाला असें स्पष्टपणे दिसते की, मुलाचा ओढा बहुधा बापाच्या धंद्याकडे असतो, मुलाने आपला धंदाच पुढे चालवावा असा मनोदय बापाचाही असतो, आणि त्याप्रमाणे उभयपक्षी तयारी करतात; तर जेव्हां धंदे थोडे आणि त्यांचे ज्ञान मिळविण्याची सार्वजनिक साधने व सोयीही थोड्या व एक घरी होत्या, अशा प्राचीन काळांत बापाच्या धंद्याची माळ मुलाच्या गळ्यांत सर्रास पडे, ह्यांत नवल ते कोणतें? पुष्कळ धंदे वंशपरंपरेने चालतात ह्याचे मुख्य कारण हे की, मुलाला वडिलार्जित मिळकत आयती मिळते, त्याचप्रमाणे वडिलार्जित धंद्याचे बरेचसें ज्ञान त्याला बसल्याजागी अनायास प्राप्त होते. जातां येतां वडिलांचे काम नजरेखालून जाते, त्यासंबंधाने ते काय बोलतात हे उंबरा न ओलांडतां कानी पडते, आपण ते काम करूं म्हटल्यास सर्व सामुग्री घरच्या घरी सिद्ध असते, आणि त्याचे वर्म समजून घेण्याचे मनांत आणिल्यास कळकळीचा सांगणारा तत्पर असतो. म्हणतातना, जांवयाबरोबर जेवावे व मुलांबरोबर शिकावें. प्रत्यक्ष बापापेक्षा अधिक हितचिंतक विद्यागुरु कोण भेटणार? धंद्याला काय लागते, खरी मेहनत व कूस किती ह्याचा खडानखडा माहीत