पान:गांव-गाडा.pdf/312

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कित्येक तर ह्या विधीचे गंभीर स्वरूप न जुमानतां क्षौराचे पाठोपाठ सधन यात्रेकरूंचे पाय रगडतात आणि बक्षीस मागतात !! गाडीवानाचा व हमालाचा धंदा बडा छाकटा असतो. रस्त्यावरील स्टेशनें व त्रिस्थळी येथे त्यांचा रोजगार असा चालला आहे की पुसूं नका. त्यांच्या मागणीला आगा-पिछा मुळीच नसतो. कड लावण्यापर्यंत ज्ञान व फुरसत असलेला यात्रेकरू लाखांत एखादा. त्यामुळे त्यांच्या तोंडाला रक्त लागून त्यांचा जबडा दिवसेंदिवस फुगतच आहे. बिऱ्हाडाचे ठिकाण तसेच तेथून देऊळ, स्नानाचा घाट वगैरे किती दूर आहे हे माहीत नसल्यामुळे आणि उपाध्यायांच्या मिंधेपणामुळे गाडीवान चांगलेच चरतात, आणि दुप्पट भाड्याचा ठराव झाला असला तरी शेवटी 'बक्षिस' 'धर्म' किंवा 'पोलीसची 'दस्तुरी म्हणून दोन चार आणे तरी कटकट घालून ज्यास्त काढतात. शहरांतल्या हमालांचाही तोच नमुना. रेल्वे हमाल पाहतां मनमाड काहींसें बरें. परंतु भुसावळपासून पुढे त्यांच्या थापाथापीस व आडवणुकीस सीमा नाही. महारजागल्यांचे पोट ज्याप्रमाणे रयतेकडून होणाऱ्या प्राप्तीवर चालतें त्याप्रमाणे ह्या हमालांचे पोट परभारें उतारूंवर चालतें, एवढेच नव्हे तर त्यांना परवाना काढण्यासाठी रेलवे कंपनीला दरसाल तीस चाळीस रुपये फी भरावी लागते असे सांगतात. असें ऐकण्यांत येते की, रेलवेच्या नोकरीतल्या हमालाला बारा रुपये दरमहा आहे. तथापि त्यांच्या जागांपेक्षां लायसेन्ड कुलीच्या (बिन पगारी हमाल) जागांवर शेकडों उड्या पडतात आणि त्या मिळविण्याला पुष्कळ शिफारस भिडवावी लागते. रेलवे हमालांचे म्हणणे असें आहे की, 'आम्हांला रेलवे कामगारांच्या मकानांत व कचेऱ्यांत पाळीपाळीने बिगार करावी लागते, आणि जी मिळकत होते तिच्यांत 'प्राप्तीचा अर्धा वांटा ' किंवा अधिक पडद्याआड घेणारे पुष्कळ आहेत. त्यामुळे जरी दीड दोन रुपये रोज आमच्या हातांत येतो तरी पदरांत कांही पडत नाही' वगैरे, वगैरे. स्टेशनपासून धर्मशाळा किती दूर आहे हे पुष्कळ उतारूंना माहीत नसल्याने रेल्वे हमाल पहिल्याने हक्काने मिळणाऱ्या मजूरीपेक्षा दसपट आधिक सांगतात, आणि